शिर्डीजवळ समृद्धी महामार्गाचा भराव ढासळला; बांधकाम दर्जावर प्रश्नचिन्ह; सरकारवर टीकेचा भडिमार

कोटय़वधी रुपये खर्चून बांधकाम केलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या दर्जावर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शनिवारी रात्री झालेल्या पावसात शिर्डीजवळ समृद्धी महामार्गाचा भराव ढासळला. दोन वर्षांपूर्वी बांधकाम केलेल्या महामार्गाला याआधी भगदाड पडले होते. त्यानंतर ही घटना घडल्याने सरकारवर जोरदार टीका होत आहे.

जून महिन्यात छत्रपती संभाजीनगर जिह्यातील माळीवाडा परिसरात समृद्धी महामार्गावरील पुलाच्या मध्यभागी मोठे भगदाड पडले होते. समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण होऊन दोन वर्षेही झालेली नाहीत. त्यात अशा प्रकारे भगदाड पडणे, तडे जाणे, भराव ढासळणे हे सत्र सुरू राहिले आहे. शनिवारी रात्री शिर्डी परिसरात परतीच्या पावसाने हजेरी लावली. सलग काही तास पाऊस सुरू होता. याचदरम्यान कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण टोल प्लाझा परिसरात समृद्धी महामार्गाचा भराव ढासळला. महामार्गाच्या संरक्षक कठडय़ाला लागून असलेला मातीचा ढिगारा खाली गेला आहे. त्यामुळे महामार्ग आणखी खचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हजारो कोटी रुपयांचा खर्च, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि गुणवत्तेची हमी दिल्यानंतरही समृद्धी महामार्गावर प्रवासी सुरक्षेला धोका निर्माण करणाऱया घटना घडत आहेत. याचबरोबर अपघातांचे सत्र सुरू असल्याने महायुती सरकारच्या ‘वेगवान विकासा’च्या दाव्यावर वाहनधारक तसेच सामान्य नागरिकांकडून जोरदार टीका केली जात आहे.

महामार्ग आणखी खचण्याची भीती

पावसाच्या पाण्याच्या प्रवाहात महामार्गासाठी वापरलेल्या दगड आणि मातीचा भराव पूर्णपणे वाहून गेला. त्यामुळे थेट महामार्गाच्या पायाला धोका निर्माण झाला आहे. शनिवारी भराव ढासळलेल्या भागात महामार्ग आणखी खचू शकतो. त्यात मोठा अपघात घडू शकतो, अशी भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. विकासाचा दिखावा करताना बांधकाम प्रकल्पांमध्ये गैरव्यवहार होणार नाही याची खबरदारी सरकारने घ्यावी,  असा संताप समृद्धी महामार्गावरील वाहनधारकांनी व्यक्त केला.