
>> संध्या शहापुरे
समर्थ रामदास दासबोधात म्हणतात- ‘करी दुर्जनांचा संहार, भक्त जनासी आधार, ऐसा तो हा चमत्कार, रोकडा चाले’. प्रस्तुत श्लोकातही प्रभू श्री रामचंद्राच्या चरित्राचा हा वेगळा पैलू दिसून येतो. ‘रघुपति राघव राजाराम, पतित पावन सीताराम’ या लोकप्रिय भजनात वर्णन केलेले रामाचे हेच केवळ रूप नाही, तर रामदासांनी वर्णन केल्याप्रमाणे श्रीराम सात्विकाशी सात्विक आहे आणि दुर्जनांचा संहार करणारा आहे. श्रीरामाच्या पायातील ब्रीद रुपी तोडरांचा आवाज सतत समुद्राच्या गाजेसारखा गुंजतो आहे; तो भक्त रक्षणाचा आणि दृष्टांपासून भक्तांचे रक्षण करण्याचा आहे. समर्थ रामदासांनी रामायणातील केवळ युद्धकांड आणि किष्किंधा कांड या दोनच कांडांवर मराठीत रचना केली आहे. प्राचीन व मध्ययुगीन मराठी साहित्यात जवळजवळ प्रत्येक कवीने रामायणावर रचना केली आहे. श्रीधरांनी ‘रामविजय’ हा ग्रंथ लिहिला. कृष्णदास मुद्गलांनी ‘युद्धकांड रामायण’ रचले आहे. एकनाथांनी ‘भावार्थ रामायण’ लिहिले तर मुत्तेश्वरांनी ‘भावार्थ रामायण’ पुरे करण्यासाठी ‘संक्षेप रामायण’ लिहिले आहे. मोरोपंतांनी तर ‘108 रामायणे’ रचून रामकथा गायनाचा विक्रमच केला आहे. रामकथा एकच असली तरी प्रत्येक कवीचा लेखन काळ वेगळा, त्यांचे व्यक्तिमत्त्व वेगळे, पण रामकथा लिहिण्यामागचा उद्देश एकच होता- मनावर सुसंस्कार करण्याचा!



























































