संगमेश्वरात चौपदरीकरणामुळे घरांना तडे, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई–गोवा महामार्गावरील संगमेश्वर ते माभळे दरम्यान सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या विकासाची कामेामुळे माभळे गावातील काही घरांना तडे गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबई–गोवा महामार्गावरील संगमेश्वर–माभळे टप्प्यातील चौपदरीकरणाची विकासाची कामे तब्बल 17 वर्षे रखडली होती. रखडलेल्या सोनवी पुलासह या मार्गावरील विकासाची कामे अखेर कंत्राटदार कंपनीकडून हाती घेण्यात आली आहेत. गणेश हॉटेल ते पुनर्वसन परिसरादरम्यान रस्ता रुंदीकरण सुरू असून, या दरम्यान मोठ्या प्रमाणात डोंगर उत्खनन केले जात आहे.

माभळे येथील रहिवासी डॉ. हर्षदा डिंगणकर यांच्या घराजवळ मोठ्या प्रमाणात डोंगर खोदकाम सुरू असून, ही खोदाई हद्दरेषेबाहेर केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. घरांच्या सुरक्षिततेचा कोणताही अंदाज न घेता उत्खनन सुरू असल्याने त्यांच्या घराला तडे जाऊ लागल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच उज्वला खापरे आणि घडशी यांच्या घरांकडे जाण्यासाठी समोरील मार्ग ठेवण्यात आलेला नाही. याबाबत त्यांना कोणताही मोबदला मिळालेला नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे. चौपदरीकरणाची सीमारेषा निश्चित असतानाही ती वारंवार बदलली जात असल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रम वाढला आहे. कामाच्या पद्धतीमुळे जीवित व मालमत्तेला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी कंत्राटदार कंपनी आणि संबंधित प्रशासनाकडे तातडीने संरक्षण भिंत उभारणे, सुरक्षित उत्खनन करणे, बाधितांना योग्य मोबदला देणे आणि चौपदरीकरणाची सीमारेषा स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.