
महापालिकेने प्रतापसिंह उद्यानात पक्षी संग्रहालयाच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीने सव्वा कोटींचा निधी दिला आहे. या निधीतून पक्षी संग्रहालयाचे काम होणार आहे. पण हे संग्रहालय पूरपट्ट्यात बांधले जात आहे. भविष्यात महापूर आल्यास पक्ष्यांना धोका होणार आहे. तसेच पक्ष्यांसाठी आवश्यक असलेले डॉक्टर मनपाकडेदेखील नाहीत. शहराची हवादेखील प्रदूषित आहे. त्यामुळे पक्ष्यांच्या जीवाशी खेळ करण्याचा हा प्रकार आहे, अशी भावना पक्षीप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.
सांगली महापालिका मुख्यालयाजवळील प्रतापसिंह उद्यान कधीकाळी सिंहांच्या डरकाळीने दणादणून जात होते. गेल्या 17 वर्षांत या उद्यानाला अवकळा आली आहे. सध्या प्राणी संग्रहालयाला परवानगी दिली जात नाही. त्यामुळे तत्कालिन सत्ताधाऱ्यांनी प्रतापसिंह उद्यानात पक्षी संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी महासभेची मान्यता घेण्यात आली. तो प्रस्ताव अॅनिमल वेलफेअर बोर्ड व सेंट्रल झू अॅथोरिटीकडे पाठविण्यात आला. त्यानुसार त्यांनी अटी व शर्तीनुसार महापालिकेला पक्षी संग्रहालय उभारण्यास परवानगी दिली आहे. त्यामध्ये देशी पक्षी असणारे कावळा, चिमणी आदी पक्ष्यांना मनाई केली आहे. मात्र, बदक, राजहंस, कोंबड्यांचे विविध प्रकार, इमू यातून वगळले आहे. तर विदेशी पक्ष्यांना परवानगी दिली आहे. त्यानुसार महापालिकेने पक्षी संग्रहालयाचा निर्णय घेतला.
पक्षीमित्र व तज्ञांच्या सल्ल्याने प्रत्येक जातीच्या पक्ष्यांसाठी वेगवेगळे पिंजरे तयार करण्याविषयी चर्चा झाली. एक कोटी 26 लाखांचा प्रस्ताव तयार करून जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्यात आला. या प्रस्तावाला मान्यता मिळाली आणि कामालादेखील सुरुवात करण्यात येणार आहे. यामध्ये विदेशी पक्षी पाहण्यासाठी मिळणार आहेत. पक्ष्यांसाठी पिंजरे, दवाखाना, फूड मॉल, सीसीटीव्ही कॅमेरे, पक्ष्यांवर लक्ष ठेवण्यासाठी वॉररूमदेखील उपलब्ध असणार आहे. पक्षी संग्रहालयात वाघ, सिंह, हत्ती यांची प्रतिकृती व त्यांचे आवाजदेखील ऐकायला मिळणार आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून कामाला सुरुवात करण्यात आली आहे. राज्य सरकारने महापालिका क्षेत्रासाठी 50 कोटींचा निधी दिला आहे. यातील 1 कोटींचा निधी पक्षी संग्रहालयासाठी आहे. मात्र, या कामाला आता विरोध होऊ लागला आहे. प्रतापसिंह उद्यान हे पूरपट्ट्यात येते. तशी मार्किंगदेखील लावली गेली आहे. महापूर आला की उद्यानात पाच ते सहा फूट पाणी येते. मग त्यावेळी पक्ष्यांचे काय होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. प्रतापसिंह उद्यानातील वन्य प्राणी, विदेशी पक्षी इतर प्राणी संग्रहालयात स्थलांतर करण्यात आले होते. त्यावेळी मनपावर ठपका ठेवला होता. आता परत या विदेशी पक्ष्यांचे हाल होणार नाही, याची जबाबदारी कोण घेणार? शिवाय पक्ष्यांच्या उपचारासाठी मनपाकडे वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नाहीत. मग पक्ष्यांची निगा कशी राखणार, असा सवाल पक्षीप्रेमी करीत आहेत.
श्यामरावनगरमध्ये हवे होते पक्षी संग्रहालय
शहरातील श्यामरावनगर परिसर येथे पाणतळ ठिकाण असल्यामुळे तिथे पक्ष्यांसाठी खूप छान अधिवास निर्माण झाला आहे, म्हणून तेथील पाणीतळ परिसर जागा पक्ष्यांसाठी आरक्षित करणे आवश्यक होते. त्या ठिकाणी 186 पेक्षा अधिक पक्ष्यांच्या जाती सांगलीतील पक्षी अभ्यासकांनी नोंद केली आहे. पूरपट्ट्यात पक्षी संग्रहालय बांधण्यापेक्षा श्यामरावनगरमध्ये विकसित करणे आवश्यक होते.
पक्षी संग्रहालयातील भविष्यातील अडथळे
पूरपट्ट्यात असल्याने महापूर आल्यास पक्ष्यांचे काय होणार?
हवा प्रदूषणामुळे पक्ष्यांच्या आरोग्याला धोका
पैदास मोठ्या प्रमाणात; वाढीव पक्ष्यांचे नियोजन काय?
प्राण्यांप्रमाणे पक्ष्यांच्या जीवाशी मनपा खेळणार
खाद्य, विष्ठा याचे नियोजन कसे होणार?