
बैलगाड्यांचे सामर्थ्य, बैलावर प्रेम आणि गोवंश संवर्धनाच्या नावाखाली भरवलेल्या बैलगाडी शर्यतीवेळी दुर्दैवाचे वादळ आले. नियोजनशून्यतेचा कळस अनेकांना अनुभवता आला. बैलगाडी शर्यती पाहण्यासाठी आलेल्या एका वृद्धाचा बैलगाडीच्या धडकेत मृत्यू झाला, तर अल्पवयीन मुलासह अनेक लोक जखमी झाले. मात्र, काही मंत्र्यांच्या वर्चस्वामुळे अद्यापही संयोजकांवर गुन्हाही दाखल झालेला नाही. त्यामुळे सांगलीकर नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव येथील कोंड्याच्या माळावर रविवारी भव्य बैलगाडी शर्यती आयोजित केल्या होत्या. थार या चारचाकी गाडीबरोबरच जीप, बुलेट आणि शंभर ते दीडशे इतर दोनचाकी गाड्यांची बक्षिसे या शर्यतीसाठी ठेवली होती.
आदत गटातील शर्यतीदरम्यान बैल बुजले आणि तीन ते चार बैलगाड्या धावपट्टी सोडून उधळल्या. शर्यत पाहण्यासाठी रस्त्याकडेला उभे असलेले अंबाजी चव्हाण (वय ६०, रा. बुद्धीहाळ, ता. सांगोला) यांना वेगाने उधळलेल्या बैलगाड्यांची पाठीमागून जोरदार धडक बसली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यावेळी अनेक शर्यतप्रेमीही जखमी झाले. त्यात अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याची चर्चा आहे.
मोठा गाजावाजा करत आणि भरमसाठ बक्षिसांच्या आमिषाने या बैलगाडी शर्यतीसाठी स्पर्धकांनी गर्दी केली होती. त्याचबरोबर शर्यतरसिकांचीही मोठी गर्दी झाली होती. मात्र, गर्दीचा अंदाज, सुरक्षा आणि वैद्यकीय व्यवस्था, वाहतूक नियंत्रण, आपत्कालीन रस्ते, यापैकी कशाचे नियोजन केलेले दिसले नाही. धक्कादायक म्हणजे आयोजनस्थळी प्रथमोपचार केंद्र तर नव्हतेच, पण जखमींची साधी चौकशी करण्याची तसदीसुद्धा आयोजकांनी घेतली नसल्याची चर्चा आहे.
रानं उद्ध्वस्त, पिकांची नासाडी
शर्यतीत सहभागी झालेले बाहेरगावातील बैलगाडीचालक आणि मालक स्थानिक शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचे चित्र होते. आयोजक मात्र गांधारीच्या भूमिकेत वावरत होते. बैलांना चारण्यासाठी शेतकऱ्यांच्या रानातील कडबा जबरदस्तीने उचलला गेला. शेतीला पाणी देण्यासाठी केलेल्या पाइपलाइनचे कॉक बैलगाडीचालकांनी तोडले. बैलगाड्या उभ्या पिकातून पळवल्या. या शर्यतीवेळी शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. पण, याबाबत आयोजकांनी दखल घेतली नाही.
बैल तीन तास ताटकळत
स्पर्धेवेळी आयोजकांच्या वर्तनाविषयी शर्यतप्रेमींमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळाला. शर्यतस्थळी मान्यवरांची मिरवणूक काढली. त्यासाठी शर्यतीसाठी जुंपलेल्या बैलांना तीन तास ताटकळत ठेवून उर्वरित शर्यती सोडण्यात आल्या. हे सर्व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अनेक मंत्र्यांच्या साक्षीने घडत असल्याने सरकार नेमकं कुणाचे हित साधते आहे? असा सवाल या निमित्ताने उपस्थित करण्यात आला.
आयोजकांवर गुन्हा दाखल करा
बैलगाडी शर्यतीचे नियोजन शून्य आयोजन करून एका वृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल आयोजकांवर जिल्हा प्रशासनाने तातडीने गुन्हा दाखल करावा; अन्यथा लोकशाही मार्गाने आम्ही न्याय मागू, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख पैलवान विशालसिंग राजपूत यांनी दिला. स्वतःच्या फायद्यासाठी मुक्या जनावरांना आणि हजारो शौकिनांना वेठीस धरणाऱ्या आणि एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या या शर्यतीची सरकारने गंभीर दाखल घ्यावी. या शर्यतीसाठी लाखो रुपयांची उधळण कशी केली, या सर्व प्रकरणाची चौकशी करावी आणि आयोजकांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही राजपूत यांनी यावेळी केली.




























































