नशेची झिंग आणणाऱ्या 52 इंजेक्शनसह तिघांना अटक, इचलकरंजीत पोलिसांची कारवाई

इचलकरंजी येथील गावभाग पोलिसांनी मिशन झीरो ड्रग्जअंतर्गत मोठी कारवाई करून प्रतिबंधित 52 नशेच्या इंजेक्शन बॉटलचा साठा पकडून तिघांना अटक केली आहे. यामुळे शहरात इंजेक्शनद्वारे नशा करणारी टोळी प्रथमच उघड झाली आहे.

पोलिसांनी प्रथम वृंदावन कॉलनी अपार्टमेंट श्रीपादनगर येथील संशयित संग्राम अशोक पाटील (वय 29) याच्या घराजवळ सापळा लावला होता. संग्रामच्या घरातून येणाऱ्या एका इसमाला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याजवळ प्रतिबंधित पाच बॉटल आढळल्या. त्याने आपले नाव सचिन सुनील मांडवकर (वय 25, रा. यशवंत कॉलनी, इचलकरंजी) असे सांगितले. तर अधिक तपासात लालनगर येथील अभिषेक गोविंद भिसे (वय 25) याचे नाव पुढे आले. त्याला ताब्यात घेतले असता त्यांच्या झडतीत सात नशेच्या इंजेक्शन बॉटल मिळाल्या आणि घरातील झडतीत 22 बॉटल आणि रोख 60 हजार रुपये पोलिसांनी जप्त केले. पोलिसांनी संग्राम, सचिन, अभिषेक या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून या साखळीतील इतरांचा शोध सुरू केला आहे.

या कारवाईत 22 हजार रुपये किमतीच्या एकूण 52 बॉटल आणि पाचशे रुपये किमतीच्या नोटा अशी 60 हजारांची रक्कम आणि एकूण 45 हजारांचे तीन मोबाईल हॅण्डसेट आणि एक लाख दहा हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी असा एकूण 2 लाख 37 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईने इंजेक्शनद्वारे नशा करणारी साखळी प्रथमच उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलीस निरीक्षक महेश चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक पूनम माने, अनिल पाटील, सुनील पाटील, फिरोज बेग, अमर शिरढोणे, बाजीराव पोवार, आदित्य दुंडगे, ताहीर शेख, इंगवले यांच्या पथकाने ही कारवाई केली.