माळवाशी गावातील धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद, उपचारादरम्यान मृत्यू

संगमेश्वर तालुक्यातील माळवाशी गावात गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला अखेर वनविभागाने पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश मिळवले. काल शनिवारी हाती आलेल्या या कारवाईमुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला. सतत गावात वावरत असल्याने या बिबट्याची प्रचंड दहशत निर्माण झाली होती.

दरम्यान, जेरबंद करण्यात आल्यानंतर उपचार सुरू असताना बिबट्याचा मृत्यू झाला. त्याला न्यूमोनिया झाला असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले असून तो आजारी असल्यामुळेच तो वारंवार गावात दिसत होता, अशीही माहिती देण्यात आली आहे.

माळवाशीमध्ये हा बिबट्या दिवसाढवळ्या दिसत होता. शाळेत ये-जा करणाऱ्या मुलांनाही तो अनेकदा दिसल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मुलांना शाळेत आणणे-नेणे ही जबाबदारी पालक स्वतः पार पाडत होते. शिक्षकही पालक आल्याशिवाय विद्यार्थ्यांना घरी सोडत नव्हते. बिबट्याने गावातील कुत्रे-मांजरींचा फडशा पाडल्याने दहशत अधिक वाढली होती.

शनिवारी दुपारी करंडेवाडी परिसरातील रस्त्याच्या मोरीतील पाईपमध्ये बिबट्या आढळल्याची माहिती वनविभागाला मिळाली. परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सागर गोसावी, वनरक्षक आकाश कडूकर, सुरज तेली, सहयोग कराडे, सुप्रिया काळे आदी पथकाने घटनास्थळी धाव घेत पिंजरा लावला. जवळपास तीन तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला सुरक्षितपणे पिंजऱ्यात पकडण्यात आले.

सदर बिबट्या मादी असून वय अंदाजे 3 ते 4 वर्षे आहे. पशुसंवर्धन विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली असता तो आजारी असल्याचे निदर्शनास आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात त्याला न्यूमोनिया झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. वनविभागाकडून बिबट्याचे अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, परिसरात आणखी एक-दोन बिबटे असल्याचा ग्रामस्थांचा दावा असून वनविभागाने सतर्कता वाढवली आहे.