
हिंदुस्थानची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिने पाकिस्तानी खेळाडू शोएब मलिकसोबत लग्न केले होते. मात्र लग्नानंतर काही वर्षातच दोघांमध्ये घटस्फोट झाला. शोएबसोबत घटस्फोट झाल्यानंतर आपल्याला पॅनिक अटॅक येत होते आणि आयुष्यातील या कठीण काळामध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक, कोरिओग्राफर फराह खान हिने आपल्याला कसा आधार दिला याबाबत सानियाने खुलासा केला आहे. युट्यूब टॉक शोमध्ये ती बोलत होती.
सानियाने ‘सर्व्हिंग इट अप विथ सानिया’ (Serving It Up With Sania) हा नवीन यूट्यूब टॉक शो सुरू केला असून पहिल्याच एपिसोडमध्ये तिने आयुष्यातील सर्वात भावनिक क्षणांवर भाष्य केले. पहिल्या एपिसोडसाठी फराह खान ही प्रमुख पाहुणी म्हणून आली होती. दोघींमध्ये दिलखुलास संवाद झाला. यावेळी तिने शोएब मलिकसोबत घटस्फोट घेतल्यानंतर फराह खान आपल्याला यातून सावरण्यास कशी मदत केली हे सांगितले.
“मला कॅमेऱ्यावर याचा उल्लेख करायचा नाही, पण एक क्षण असा होता जो माझ्या सर्वात वाईट क्षणांपैकी एक होता. जेव्हा तुम्ही (फराह खान) माझ्या सेटवर आलात आणि त्यानंतर मला एका लाइव्ह शोसाठी जायचे होते. तुम्ही तिथे आला नसता तर मी थरथरत होते आणि मी तो शो केला नसता. तुम्ही मला म्हणालात, काहीही झाले तरी तू हा शो करत आहेस”, असे सानियाने सांगितले
त्या दिवसाची आठवण करत फराह म्हणाली की, “सानियाला इतकी अस्वस्थ पाहून ती खूप घाबरली होती. मी खूप घाबरले होते. मला त्या दिवशी शूटिंग करायची होती, पण मी सगळं सोडून पायजमा आणि चप्पल घालून तिथे पोहोचले. तिला फक्त त्या क्षणी तिच्या मैत्रिणीसोबत राहायचे होते. कारण मला तिला पॅनिक अटॅक येताना पहायचे नव्हते.”
दरम्यान, सानियाने एप्रिल २०१० मध्ये शोएब मलिकशी लग्न केले आणि २०१८ मध्ये त्यांचा मुलगा, इझहान मिर्झा मलिक याचा जन्म झाला. जानेवारी २०२४ मध्ये शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्न केल्याची घोषणा केली. त्यानंतर सानियाच्या कुटुंबाने या जोडप्याच्या वेगळे होण्याची (तलाक) पुष्टी केली.



























































