क्रिकेटनामा – विराटच्या निवृत्तीमागे गंभीर नाही!

>> संजय कऱ्हाडे

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात विराटने केलेली तेजोमयी खेळी पाहून हा माणूस कसोटी क्रिकेटमधून का निवृत्त झाला, असा सवाल मला पडला. संजय मांजरेकर म्हणतो त्याप्रमाणे विराटने तन-मन लावून पुन्हा आपला ठसा उमटवायचा प्रयत्न केला नसेल का? आणि वनडे क्रिकेट खेळणं सोपं आहे का?

स्वतः संजय दोन्ही क्रिकेट खेळलाय. त्यामुळे त्याच्या म्हणण्याची दखल आवश्यक. ‘वनडेमध्ये चार स्लिप्स, दोन गली अशी क्षेत्ररचना नसते. त्यामुळे आघाडीच्या फळीत खेळणाऱ्या फलंदाजांसाठी धावा करणं अधिक सहज सोपं असतं. मात्र पाचव्या, सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर खेळणाऱ्या फलंदाजांची अधिक कसोटी लागते. त्यांच्यावर सामना जिंकवण्याची जबाबदारी असते’ असंही संजयने म्हटलंय.

विराटने कसोटीतून आपली निवृत्ती जाहीर करण्यामागे गंपू गंभीर किंवा एकूण व्यवस्थापनाचं दडपण आहे असा एक लोकप्रिय होरा आहे. मात्र, थोडय़ा अभ्यासांती मला त्यातला पह्लपणा जाणवला!

साधारण कोविडच्या सुमारास विराटच्या बॅटीला ग्रहण लागलं. तेव्हापासून आज त्याची सरासरी छपन्नवरून सेहेचाळीसपर्यंत खालावली. दरम्यान, शतकी मानवंदना स्वीकारण्यासाठी त्याच्या बॅटने केवळ तीनदाच आपली गर्दन उंचावली! विराटचा हा लौकिक अनोळखीच. अशीच काहीशी वेळ 2014 च्या इंग्लंड दौऱ्यावर आली होती. पाच कसोटींत विराटने चौदाच्या सरासरीने 134 धावा केल्या! त्यानंतर विराटने सचिन अन् रवीसारख्यांशी सल्लामसलत केली, तंत्रात सुधारणा केली, तासन् तास सराव केला, ऑफ स्टम्पबाहेरील चेंडूंकडे चुंबकाप्रमाणे जाणारी बॅट आवरली, उभं राहण्याच्या पद्धतीत आवश्यक बदल केले. मनात घर करून बसलेल्या शंकांचं निरसन केलं आणि 2015च्या  ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर चार शतकांसह जवळपास सातशे धावा दणकावल्या. तसंच 2018च्या इंग्लंड दौऱ्यावर ध्यासमग्न सहाशे धावा चमकवल्या! मात्र, नेमका असाच प्रयत्न विराटने 2020नंतर केला नाही असं संजय मांजरेकरला वाटणं संयुक्तिक असू शकतं.

प्रशिक्षक म्हणून गंभीरची नेमणूक झाली जुलै 2024 मध्ये. म्हणजे विराटची बॅट बोथट झाल्यापासून पार साडेतीन वर्षांनी. या दरम्यान विराटने नेमके काय प्रयत्न केले? नक्की ठाऊक नाही! कुणी सांगावं, प्रयत्न करून अयशस्वी ठरला असेल! किंवा, 2014 मध्ये खवळलेल्या समुद्रात उडी मारण्याची त्याची हिंमत काळानुरूप आता हरपली असेल! माझं काही चुकतंय, असं जाहीर म्हणण्याचा प्रामाणिकपणा त्यानेच दडपला असेल!

कदाचित, कमजोर विंडीज आणि आफ्रिकेविरुद्धच्या एकूण पाच कसोटी खेळणं विराटला पुरेसं स्फूर्तिदायक वाटलं नसेल! कसोटीत दहा हजार धावांचा टप्पा गाठणंसुद्धा प्रेरणादायक वाटलं नसेल! किंवा, वनडे वर्ल्ड कपनंतर होणारे कसोटी सामने ‘फार दूर’ आहेत असंही वाटलं असेल!

कारण काही असो, कसोटीतून विराटची निवृत्ती झाली 2025च्या मेमध्ये. अन् आजही गंभीर प्रशिक्षक असताना वनडे संघात खेळणं त्याला वावगं वाटत नाहीये! अन्यथा, तो वनडे क्रिकेटही सोडून बसला असता.

असो, कसोटी म्हणा, वनडे म्हणा; कठीण म्हणा, सोपं म्हणा; विराटने कसोटी क्रिकेटमध्ये 9,230 आणि वनडे क्रिकेटमध्ये 14,650 धावा केल्यात एवढंच आमच्या ठावकी!

विराट, तू खेळत रहा!