
देशाची अर्थव्यवस्था सध्याच्या घडीला पूर्णपणे ढेपाळली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया रसातळाला गेला असून महागाईची लाट धडकली आहे. आर्थिक विकास मंदीच्या या खडतर काळात संजय मल्होत्रा यांची आरबीआयच्या गव्हर्नरपदी नियुक्ती झाली आहे. विविध प्रश्नांनी घेरलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला सावरण्याचे मोठे आव्हान मल्होत्रा यांच्यापुढे असणार आहे.
संजय मल्होत्रा 1990 च्या बॅचचे आणि राज्यस्थान कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. ते आरबीआयचे 26वे गव्हर्नर आहेत. त्यांनी कानपूर येथून संगणक शास्त्रामध्ये अभियांत्रिकीची पदवी मिळवली आहे. तसेच अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठातून सार्वजनिक धोरणात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांमध्ये मल्होत्रा यांचा समावेश आहे.
मावळते गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ मंगळवारी संपत आहे. उर्जित पटेल यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर 12 डिसेंबर 2018 रोजी दास यांची नियुक्ती झाली होती. तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांना दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली होती.
राज्य व केंद्रात 33 वर्षांचा अनुभव
मल्होत्रा यांनी वित्त, कर, ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान, खाणी आदी प्रमुख क्षेत्रांत 33 वर्षांहून अधिक काळ काम केले आहे. ते केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत वित्तीय सेवा विभागात सचिव होते. राज्य व केंद्र सरकारच्या वित्त आणि कर आकारणी क्षेत्रातील कामाचा मोठा अनुभव आहे. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष करांसंबंधी धोरण तयार करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. कर वसुलीच्या व्यवस्थेतही विशेष योगदान दिले आहे.