पुढच्या सामन्यात कुलदीप खेळणार नाही, संजय मांजरेकरांची संघव्यवस्थापनावर अप्रत्यक्ष टीका

दुबईत झालेल्या आशिया कपमध्ये हिंदुस्थानने दमदार विजयासह सुरुवात केली. या विजयाचा खरा सूत्रधार कुलदीप यादव होता. त्याने केवळ 2.1 षटकांत 7 धावांत 4 विकेट घेत यूएईचा डाव उद्ध्वस्त केला. त्याने आपल्या दुसऱ्या षटकांत तर 3 विकेट घेतल्या. या कामगिरीनंतरही कुलदीप यादवचे संघातील स्थान अस्थिर असल्यामुळे माजी कसोटीपटू संजय मांजरेकर यांनी अप्रत्यक्षपणे गौतम गंभीरवर टीका करताना, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कुलदीप खेळण्याची शक्यता नसल्याचे ट्विट एक्सवर केले आहे.

इंग्लंडमधील कसोटी मालिकेत पाचही सामने कुलदीप यादवला बेंचवर बसवल्यामुळे संघ व्यवस्थापनावर जोरदार टीका करण्यात आली होती. या अपमानास्पद वागणुकीनंतर संघात परतलेल्या कुलदीपने लगेचच आपली छाप सोडली. यूएईविरुद्धच्या विजयाचा शिल्पकार कुलदीपच होता; मात्र संघात संघव्यवस्थापनाच्या मनात त्याचे स्थान अस्थिर असल्यामुळे तो पाकिस्तानविरुद्ध सामन्यात खेळण्याची शक्यताही कमी असल्याचे मत संजय मांजरेकर यांनी सूचकपणे मांडत आपली नाराजी व्यक्त केलीय.

दुबळय़ा यूएईविरुद्धचा सामना हिंदुस्थानसाठी प्रयोगाचा सामना असल्यामुळे त्यांनी या सामन्यात काही खेळाडूंना मुद्दाम स्थान दिले होते, जेणेकरून रविवारच्या सामन्यात त्यांना विश्रांती देता येईल. यात संजू सॅमसन आणि कुलदीप यादव या दोघांची नावे टॉपवर होती. हे दोघेही पाकिस्तानविरुद्ध संघात नसले तरी कुणाला आश्चर्य वाटणार नाही. त्यामुळेच मांजरेकरांनी एक्सवर लिहिले – ‘कुलदीपने एका षटकात 3 बळी घेतले. आता कदाचित पुढचा सामना खेळणार नाही.’ यासोबतच त्यांनी हसऱ्या इमोजीद्वारे ही टिप्पणी विनोदी स्वरूपात केली. या दोन ओळींच्या वाक्यात सारेच सामावले होते. कुलदीपकडे टीम इंडिया वारंवार दुर्लक्ष करत असल्याचेच त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले.