बीसीसीआय आणि मोदी सरकारसाठी ही लज्जास्पद बाब, पाकिस्तानी क्रिकेटर साहिबजाद्याच्या कृतीवरून संजय राऊत यांची टीका

रविवारी दुबईत हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान दरम्यान क्रिकेट सामना पार पडला. पण पाकिस्तानी बॅट्समन साहिबजादा फरहान याने अर्धशतक झाल्यानंतर AK 47 प्रमाणे बॅट धरून गोळीबाराची अॅक्शन केली. बीसीसीआय आणि मोदी सरकारसाठी ही लज्जास्पद बाब आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली.

संजय राऊत यांनी हा व्हिडीओ आपल्या एक्स अकांटवर पोस्ट केला आहे. त्यात संजय राऊत म्हणाले की, आजच्या भारत पाकिस्तान सामन्यात हे घडले. साहिबजादा फरहान याचे अर्ध शतक लागताच त्याने मैदानात AK 47 प्रमाणे बॅट धरून गोळीबाराची एक्शन केली, पाकड्यानी निरपराध भारतीय पर्यटकांना असे मारले हेच तो त्याच्या कृतीतून दाखवत होता. बीसीसीआय आणि मोदी सरकारसाठी ही लज्जास्पद बाब आहे. भारताचे लष्कर आणि पुलवामा पहेलगाम मध्ये मरण पावलेल्या निरपराध नागरिकांचा हा अपमान आहे,अमित शहा यांचे सुपुत्र जय शहा महान आहेत! असेही संजय राऊत म्हणाले.