
बदलापूर अत्याचार प्रकरणातल्या आरोपीला रवींद्र चव्हाण त्यांना घोड्यावर बसवून घेऊन चालले आहेत. हे काय चालले आहे महाराष्ट्रामध्ये? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी विचारला. तसेच जर न्यायालयात खटला चालवून त्यांचे निर्दोषत्व सिद्ध झाले असते, तर कदाचित आम्ही यावर बोललो नसतो. पण अजून खटला पेंडिंग आहे असेही संजय राऊत म्हणाले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी संजय राऊत म्हणाले की, देशभरामध्ये अलीकडच्या काही घटना आपण पाहिल्या असतील, तर या देशातील अनेक भागांमध्ये अशा प्रवृत्तीचे लोक, जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत, अशा बहुसंख्य लोकांना आपल्या पक्षात घेऊन त्यांना प्रतिष्ठा द्यायची, हे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय धोरण असल्याचे मला दिसते.
मला वाटते, बदलापूरच्या शाळेमध्ये हा लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडला होता. बदलापूर दोन दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काळ पेटले होते. आंदोलन झाले, दंगल झाली, गाड्या थांबवल्या गेल्या. मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला. राज्यातील राजकारण्यांना तिकडे पाऊल ठेवू दिले नाही. ज्या शाळेमध्ये हा सर्व प्रकार घडला, त्या शाळेच्या संचालकांनी संबंधित मुलगी आणि तिच्या आईची तक्रार सुद्धा घेऊ नये, यासाठी पोलिसांनी दबाव आणला होता.
एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला. जो शाळेच्या आवारात झाला किंवा शाळेच्या खोलीत झाला, त्या शाळेच्या संचालकांची काही जबाबदारी नाही का? त्यानंतर शाळेचे संचालक फरार झाले. मग ते ठरवून सरेंडर झाले. आता आम्हाला असे वाटले होते की ते अजूनही जेलमध्येच आहेत. पण आता तुमच्या माध्यमातून कळते की ते नगरपालिकेच्या सभागृहात आहेत आणि रवींद्र चव्हाण त्यांना घोड्यावर बसवून घेऊन चालले आहेत. हे काय चालले आहे महाराष्ट्रामध्ये? संपूर्ण देशामध्ये हे सुरू आहे.
उत्तराखंडमध्ये अंकिता भंडारीचे प्रकरण तुम्हाला माहिती असेल. भारतीय जनता पक्षाचा एक प्रमुख नेता त्या प्रकरणामध्ये आहे. तिच्यावर अत्याचार करून तिला ठार मारण्यात आले आणि ते भाजपचे खासदार झाले. आता इथे आपटे नावाचे जे आरोपी आहेत, जे आरएसएस आणि भाजपशी संबंधित आहेत, त्यांना लैंगिक अत्याचाराबद्दल भाजपने बक्षीस दिले आहे का? इनाम दिले आहे का? पूर्वी अशा कृत्य करणाऱ्यांना इनाम दिले जात होते. ते निर्दोष सुटले आहेत का? अद्याप नाही. जर न्यायालयात खटला चालवून त्यांचे निर्दोषत्व सिद्ध झाले असते, तर कदाचित आम्ही यावर बोललो नसतो. पण अजून खटला पेंडिंग आहे. खटला चालू दिला जात नाही, हेही भाजपकडून होत आहे, हे मी तुम्हाला सांगतो. आणि भविष्यात यांना सुद्धा मुख्यमंत्री ‘क्लीन चिट’ देतील.
जर देवेंद्र फडणवीस यांना काँग्रेसबरोबर युती नको आहे, म्हणून त्यांनी त्यांच्या लोकांवर कारवाई केली, असे ते म्हणतात. जर देवेंद्र फडणवीस म्हणतात की ओवेसीच्या पक्षाबरोबर आमचे वैचारिक मतभेद आहेत, आम्ही त्यांच्याबरोबर युती करणाऱ्यांवर कारवाई करू, तर मग लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींशी तुमची युती होऊ शकते का? ते आरोपी तुम्ही थेट स्वीकृत नगरसेवक करून पालिकेत पाठवत आहात. तुम्ही महाराष्ट्राच्या संस्कृतीवर थुंकत आहात. तुम्ही देशाला काय संदेश देत आहात? तुम्ही महाराष्ट्राचे राज्यकर्ते आहात. हे तुमचे काम आहे का? हा अत्यंत घृणास्पद प्रकार भारतीय जनता पक्षाने केलेला आहे.
काँग्रेस आणि एमआयएम यांच्याबरोबर शेवटी तुम्ही छुपी युती केलेलीच आहे. आणि आता एका बाजूला लैंगिक अत्याचाराचे जे प्रकरण सगळ्यात जास्त महाराष्ट्रात गाजले आणि जनता हादरली, त्यातल्या आरोपींना तुम्ही तुमच्या पक्षात सन्मानाने घेऊन महानगरपालिकेत पाठवत आहात. ते सुद्धा स्वीकृत नगरसेवक म्हणून. हा लज्जास्पद प्रकार आहे.
राज्याच्या प्रतिमेला काळीमा फासणारे कृत्य भारतीय जनता पक्ष करत आहे. लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन तुम्ही असे व्यभिचार घडवत आहात. लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन तुम्ही त्यांची अब्रू विकत घेत आहात.
अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र बसले आहेत, याचे आम्हाला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. दोन पक्ष वेगळे आहेत, दोन भाऊ-बहिण आहेत आणि दोन वेगवेगळ्या आघाड्यांमधील लोक आहेत. ते एकमेकांच्या विरुद्ध वैचारिक लढाई लढणारे लोक आहेत. अजित पवार हे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या विचारधारेचे समर्थन करतात. अजित पवार नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या राजकारणाचे, त्यांच्या लोकशाहीविरोधी कृत्यांचे, त्यांच्या संविधानविरोधी कृत्यांचे, त्यांच्या पापांचे समर्थन करणाऱ्या आघाडीत आहेत.
दुसऱ्या बाजूला शरद पवारांचा पक्ष आहे, जो या सगळ्यांना विरोध करतो. नरेंद्र मोदी लोकशाहीची हत्या करत आहेत. अमित शहा यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांचा आवाज दाबत आहेत. अमित शहा आणि नरेंद्र मोदी हिंदू-मुस्लिम अशा धर्माधारित विचारांवर निवडणुका लढतात. पण आता हे दोन पक्ष एकत्र निवडणुका लढतात. यावर भारतीय जनता पक्षाने उत्तर दिले पाहिजे असेही संजय राऊत म्हणाले.






























































