मुंबई महाराष्ट्राची नाही असे म्हणून अण्णामलाई तुमच्या थोबाडीत मारून गेला, आता तुम्ही त्याच्या लुंगीमध्ये तोंड लपवणार आहात का? संजय राऊत यांची टीका

मुंबई महाराष्ट्राची नाही असे म्हणून तो अण्णामलाई येऊन तुमच्या थोबाडीत मारून गेला, आता तुम्ही त्याच्या लुंगीमध्ये तोंड लपवणार आहात का? अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच या अण्णामलाई विरोधात गुन्हा दाखल केला पाहिजे. हा महाराष्ट्रद्रोह आहे. महाराष्ट्राच्या राजधानीबाबत तो असे वक्तव्य कसे करू शकतो? असेही संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो गोंधळ झालेला आहे, तो एक डबकं बनला आहे. आणि त्या डबक्यात बेडूक डराव-डराव करत बसले आहेत. त्यांना कोणताही विचार नाही. सध्या फक्त एवढेच आहे की, येण्या-केण्या प्रकारे माझी माणसे निवडून आली पाहिजेत.

जे स्वतःला शिवसेना वगैरे समजतात, आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे म्हणतात की सूर्य-चंद्र असेपर्यंत मी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे होऊ देणार नाही. पण तुमचे स्टार प्रचारक सांगत आहेत की मुंबई महाराष्ट्राची नाही. हा अण्णामलाई कोण आहे? तो भाजपचा नेता आहे का? असेल तर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला पाहिजे. हा महाराष्ट्रद्रोह आहे. महाराष्ट्राच्या राजधानीबाबत तो असे वक्तव्य कसे करू शकतो? 106 मराठी हुतात्म्यांचा अपमान भाजपच्या अण्णामलाईने केला असेल, तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून ताबडतोब अटक केली पाहिजे. त्याला मुंबईच्या बाहेर जाऊ देता कामा नये.

कोणी लुंग्या-सुंग्या येईल आणि मुंबई-महाराष्ट्रावर अशा प्रकारे जाऊन आमच्या तोंडावर चप्पल मारून जाईल. कुठे आहे तुमचा स्वाभिमानी बाणा? जे धनुष्यबाण चोरून मिरवतात, त्यांच्या तोंडात आता कापडाचा गोळा बसलेला आहे का? एवढे लाचार का आहात? अण्णामलाई येऊन तुमच्या थोबाडीत मारून गेला. आता तुम्ही त्याच्या लुंगीमध्ये तोंड लपवणार आहात का? कृपाशंकर बोलतो. मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होईल. अण्णामलाई येऊन सांगतो की मुंबई महाराष्ट्राची नाही. देवेंद्रजींनी यावर उत्तर दिले पाहिजे.

रश्मी शुक्ला या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्या आहेत. त्यांचे अख्खे कुटुंब भाजप आणि संघाशी संबंधित आहे. वर्दीतल्या संघाच्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवता येणार नाही. म्हणूनच त्यांना एक्स्टेंशनवर एक्स्टेंशन देण्यात आले. ते संघाच्या दबावामुळे दिले गेले.

अण्णामलाई यांच्या वक्तव्यावर आधी उत्तर द्या. मग जन्मभूमी, कर्मभूमी, धर्मभूमी काय ते आम्ही पाहू. बाळासाहेब ठाकरे यांचा इतिहास काढण्याच्या भानगडीत पडू नका. त्या खोदकामात तुम्हीच गाडले जाल.

तुमचा स्टार प्रचारक मुंबईत येऊन तुमच्या थोबाडीत मारून गेला आहे. अण्णामलाई. आता तुम्ही त्याच्या लुंगीमध्ये तोंड लपवणार आहात का? सांगा ना. मुंबई महाराष्ट्राची नाही, ही सुरुवात आहे. मुंबई तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपची ही चाचपणी आहे असेही संजय राऊत म्हणाले.