
दिल्लीमध्ये बसलेल्या दोन व्यापारी राजकारण्यांना महाराष्ट्रामधले मराठी मनं, मराठी नेते एकत्र यावे असं कधीच वाटणार नाही अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते व खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच राष्ट्रवादी असो किंवा एकनाथ शिंदेचा गट याची सूत्र ही भाजपकडेच आहेत असेही संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, नववा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करत आहेत. हा अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी गरीब आणि मध्यमवर्गीयांना नाकी नऊ आणू नये, एवढीच आमची अपेक्षा आहे. वर्षानुवर्षांची एक परंपरा आहे—संकल्पापूर्वी फार मोठ्या अपेक्षा निर्माण केल्या जातात आणि अखेरीस उद्योगपती, धनिक व व्यापाऱ्यांचाच, सत्ताधारी राजकीय पक्षाकडून सरळ किंवा आडमार्गाने फायदा करून दिला जातो. गरिबांच्या बाबतीत मात्र केवळ घोषणा केल्या जातात. त्यामुळे आता निर्मलाबाई त्यांच्या पर्समधून काय काढतात, याकडे आमच्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
आता जो आर्थिक सर्वेक्षण अहवाल समोर आला आहे, त्यामधून देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती स्पष्ट झाली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने ‘लाडकी बहीण’सारख्या लोकप्रिय योजना राबवल्या जातात, त्याचा तिजोरीवर कसा भार पडतो आणि राज्य कसे कर्जबाजारी होते, यावरही या अहवालात प्रकाश टाकण्यात आला आहे. तरीही, या देशातील बहुसंख्य मध्यमवर्गीय आणि गरीब नागरिकांना निर्मला सीतारामन काहीतरी दिलासा देतील, अशी आमची अपेक्षा आहे. निवडणुका संपल्यानंतर अशा घोषणा होत नाहीत, आणि पुढची दोन वर्षे सामान्य नागरिकांना पिळून काढले जाते, हा आजवरचा अनुभव आहे.
यानंतर संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले आणि त्या राज्याचे काम सक्षमपणे करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. यासाठीच मी पंतप्रधानांचे अभिनंदन करतो, असे राऊत म्हणाले. कारण सातत्याने इतरांवर घराणेशाहीचा आरोप करणारे, घराणेशाहीवर चिखलफेक करणारे नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले की ‘ठाकरे का परिवारवाद’, ‘गांधी का परिवारवाद’ असे म्हणतात. मात्र, त्यांनी सुनेत्राताईंचे अभिनंदन करून स्वतः जे आरोप इतरांवर करत होते, त्यातून स्वतःची मुक्तता करून घेतली आहे. त्यांना जणू मोक्षच प्राप्त झाला आहे. आतापर्यंत जे घराणेशाहीवर आरोप केले जात होते, त्या पापातून ते मुक्त झाले आहेत, असे म्हणत राऊत यांनी टोला लगावला.
सुनेत्राताई उपमुख्यमंत्री झाल्या, हा त्यांच्या पक्षाचा आणि भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत विषय आहे. त्यांच्या आमदारांनी काहीही म्हटले तरी, शरद पवार यांच्या भूमिकेतून पाहिले तर राज्यातील प्रमुख सुनील तटकरे आणि दिल्लीत प्रफुल्ल पटेल यांनी हे निर्णय घेतल्याचे सर्वजण सांगतात. मात्र शेवटी हा पक्ष अजितदादांच्या मेहनतीतून उभा राहिलेला पक्ष आहे, असे राऊत म्हणाले.
काल राज ठाकरे यांनी एक विधान केले होते की अजितदादांचा पक्ष हा रांगड्या लोकांचा पक्ष आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेबाबत अजित पवारांनी कधीही तडजोड केली नाही, जशी शरद पवारांनीही केली नाही. भारतीय जनता पक्षाच्या ताटाखालचे मांजर होण्यापासून त्यांनी अनेकदा स्वतःला दूर ठेवले. मात्र, शिंदे तसे होत आहेत. त्यामुळे हा भोसले-पाटलांचा पक्ष पटेलांचा होऊ नये. हा पाटलांचा पक्ष पटेलांचा होऊ नये. या पक्षाची सूत्रे पाटील, भोसले, मोहिते, कांबळे यांच्याच हातात राहावीत, ती पटेलांकडे जाऊ नयेत. कारण हा मराठी चेहऱ्याचा आणि मराठी अस्मितेचा पक्ष आहे. याची काळजी सुनेत्राताई पवारांनी घ्यावी, असे राऊत म्हणाले.
भारतीय जनता पक्षाचे खांदे आणि पाठिचा कणा पिचलेला आहे. त्यामुळे त्यांना नेहमी दुसऱ्यांचे खांदे लागतात. त्या पद्धतीने दुसऱ्यांचे खांदे वापरून महाराष्ट्रातील अनेक व्यक्ती, संस्था आणि पक्षांचा काटा ते काढत असतात, असा आरोपही त्यांनी केला.
2004 सााली जेव्हा राज्यात राष्ट्रवादीच्या दोन जागा जास्त आल्या होत्या. तेव्हा प्रणव मुखर्जी राजकारणात सक्रिय असताना चर्चा पुढे सरकत नव्हती. त्यावेळी शरद पवार यांनी तोडगा काढला—काँग्रेसने मुख्यमंत्रीपद घ्यावे आणि राष्ट्रवादीला मंत्रिमंडळात दोन अतिरिक्त जागा मिळाव्यात. तेव्हा अनेकांचे मत होते की पवार साहेबांनी अधिक ताणून धरायला हवे होते. मात्र शरद पवारांचा स्वभाव तसा नाही. ते नेहमी संयमाची भूमिका घेतात. त्यामुळे आजही चर्चा होते की पवार साहेबांनी मनात आणलं असतं तर अजित पवार मुख्यमंत्री झाले असते. मुख्यमंत्री होण्यासाठी अनेकदा क्षमता किंवा लायकी नसलेले लोकही मुख्यमंत्री झाले आहेत, विशेषतः भाजपच्या काळात. मात्र अजित पवार कधीच ‘होयबा’ नव्हते, असे राऊत म्हणाले.
अजित पवार यांनी दोन पक्ष एकत्र यावेत यासाठी पुढाकार घेतला होता. सहकाऱ्यांशी मनधरणी नव्हे तर मन वळवण्याचे काम सुरू होते. त्या संदर्भात दोन पक्षांच्या अनेक बैठका झाल्याची माहिती आमच्याकडे होती. अजित पवारांनी पक्ष बदलला असला, तरी त्यांच्या मनात शरद पवारांविषयी शेवटपर्यंत आस्था, आदर आणि ओलावा होता. एका विशिष्ट कारणामुळे त्यांना पक्ष बदलावा लागला. ती कारणे सर्वांनाच माहिती आहेत—धाक, दहशत, ब्लॅकमेल आणि धमक्या. तरीही त्यांना वाटत होते की जे घडले ते बरे नव्हते. शरद पवारांनी उभा केलेला हा पक्ष आहे आणि आम्ही सगळे त्यांच्यामुळे राजकारणात आलो. मात्र त्यांच्या पक्षातीलच काही लोक अजित पवारांना हे करण्यापासून रोखत होते, कारण त्यांची दुकाने बंद झाली असती.
दिल्लीतील दोन व्यापारी राजकारणी महाराष्ट्रातील मराठी नेते आणि मराठी मने एकत्र यावीत, असे कधीच इच्छित नाहीत. ‘फोडा आणि राज्य करा’ ही ब्रिटिशांची नीती होती, आणि तीच नीती आज दिल्लीतल्या सत्ताधाऱ्यांची आहे. भारतीय जनता पक्ष म्हणजेच ईस्ट इंडिया कंपनी आहे, अशी टीका राऊत यांनी केली. मराठी नेते आणि मराठी माणसे यांच्यात कायम फूट पाडून राज्य करणे, हीच त्यांची नीती आहे.
हा पक्ष कितीही राष्ट्रीय म्हटला तरी तो मुळात महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष आहे. त्यामुळे या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष हा पाटील, भोसले, कांबळे किंवा जाधव असलाच पाहिजे, अशी लोकभावना आहे. अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष असले तरी त्यांनी राष्ट्रीय पातळीवर पक्षवाढीसाठी विशेष प्रयत्न केलेले दिसत नाहीत. शरद पवारांच्या काळात मात्र अनेक राज्यांत आमदार, मंत्री आणि खासदार निवडून आले. पण अजित पवार किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्राबाहेर पक्षाचा झेंडा रोवला, असे मी पाहिले नाही, असे राऊत म्हणाले.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत अजित पवार आणि शरद पवार यांच्यात युती झाली तेव्हा आम्ही प्रश्न उपस्थित केला होता—एकाच वेळी दोन आघाड्यांमध्ये कसे राहता? अशा युती महाराष्ट्राने पाहिल्या आहेत. पण अखेरीस कुठेतरी एका गोष्टीचा त्याग करावाच लागतो. यशवंतराव चव्हाणांनंतर शरद पवारांनी शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार महाराष्ट्राला दिला आहे. त्यामुळे ते आपल्या विचारांशी प्रतारणा करतील, असे मला वाटत नाही.
या विषयावर अनेकदा चर्चा झाली, पण स्पष्टता येत नव्हती. अजित पवारांच्या दुर्दैवी निधनानंतर या चर्चांना अधिक वेग आला. 12 तारखेला काहीतरी होणार होते, अशी चर्चा होती. मात्र नेमका फॉर्म्युला काय होता, हे अजित पवार, शरद पवार किंवा फारतर जयंत पाटीलच सांगू शकले असते. अजित पवार सरकारमधून बाहेर पडणार होते की पवार साहेबांचा पक्ष सरकारमध्ये जाणार होता, याबाबत संभ्रमच होता.
राष्ट्रवादीचे सूत्र असोत किंवा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे गट असोत, या सगळ्यांच्या सूत्रधार भाजपच आहेत. कितीही हालचाल करू द्या, शेपट्या आपटू द्या—शेवटी सूत्रे अमित शहांकडेच राहणार आहेत. प्रफुल्ल पटेल ज्या पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष आहेत, त्या पक्षाबाबत फार चर्चा करणे योग्य नाही, असेही राऊत म्हणाले.
बारामतीमध्ये प्रत्यक्षात इतर कोणताही पक्ष नाही. केवळ विरोधासाठी विरोध करणे योग्य नाही. याबाबतचा निर्णय मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच घ्यायला हवा. लोकसभेत सुप्रिया पवार यांच्या विरोधात सुनेत्रा पवार उभ्या होत्या आणि विधानसभेत अजित पवारांच्या विरोधात योगेंद्र पवार उभे होते. त्यामुळे खरी लढाई तिथेच आहे. त्यात भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेना काय करते, हा प्रश्नच येत नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
























































