प्रत्येक अनैतिक गोष्टींच्या मागे एकनाथ शिंदे असतातच, संजय राऊत यांचा टोला

प्रत्येक अनैतिक गोष्टींच्या मागे एकनाथ शिंदे असतातच असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी लगावला. तसेच अनैतिक कृत्यात सहभागी झालेल्या लोकांना संरक्षण दिले जातात, म्हणून आमदार त्यांच्याकडे जमा झालेत असेही संजय राऊत म्हणाले.

दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, माननीय उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता. आणि राज ठाकरे यांनी त्या संदर्भात ज्या भावना व्यक्त केल्या आहेत, त्या त्यांच्या सोशल मिडियावर आहेत. राज ठाकरे म्हणाले की माझ्या मोठ्या बंधूंना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर आलो. मातोश्री हे आजही सगळ्यांसाठी बाळासाहेब ठाकरे यांचे निवासस्थान आहे. आणि ती श्रद्धा प्रत्येकाच्या मनात आहे आणि असायलाच पाहिजे. मी स्वतः पूर्णवेळ तिथे उपस्थित होतो. त्यांच्या भावना काय होत्या काय चर्चा झाल्या याचा मी साक्षीदार आहे. कालचा दिवस हा दोन भावांना नात्यात घट्टपण आणणारा दिवस होता. आणि त्यात राजकारण आणू नये.

एकनाथ शिंदे यांनी पक्ष चोरण्याचा प्रयत्न केला, अमित शहांनी शिवसेनेवर दरोडा टाकून, तो दरोड्याचा माल एकनाथ शिंदेंच्या हाती सोपवल्यावर एकमेव राज ठाकरे होते त्यांनी जाहीर सभेत सांगितले की शिवसेना ही राज ठाकरेंची कशी होऊ शकते? ही बाब हास्यास्पद असल्याचे राज ठाकरे म्हणाले. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांची. आमचे राजकीय मतभेद असताना जाहीरपणे हे विधान करणारे राज ठाकरे होते. एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या हाती चोरीचा माल आहे. हा मुद्देमाल कधीही जप्त होऊ शकतो. सुप्रीम कोर्टातून काय निकाल येईल भविष्यात हे कळेल असेही संजय राऊत म्हमआले.

प्रत्येक अनैतिक गोष्टींच्या मागे एकनाथ शिंदे असतातच. म्हणून तर एवढे आमदार ते जमू शकले. अनैतिक कृत्यात सहभागी झालेल्या लोकांना संरक्षण दिले जातात, म्हणून हे सगळे जमा झालेत. आता गिरीश महाजन आणि त्यांच्या पक्षाने एका व्यक्तीला गुन्हेगार म्हटलं होतं मग त्यांनाच पक्षात प्रवेश दिला. आता महाजन म्हणतात की भाजप हाऊसफूल झाल्याचे सांगितले. यांचा पक्ष चोर दरोडेखोरांचा पक्ष आहे. यात कुठली नैतिकता, कुठला संस्कार ? मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे काय? तुझा बाप अमित शहा दिल्लीत बसला आहे. ते ठरवणार एकनाथ शिंदे आणि अजित पवार नाही ठरवणार. चार मंत्र्यांना जावं लागणार. योगेश कदम, संजय शिरसाट, माणिकराव कोकाटे यांचं काय होईल हे कळेल तुम्हाला असेही संजय राऊत म्हणाले.

अमित शहांनी एकनाथ शिंदेंना ताकद दिली नसती तर तुम्ही कोण होता? तुम्ही डरपोक आणि पळून गेलेले लोक आहात. सगळे अनैतिक कृत्यात अडकलेले, हनी ट्रॅपमध्ये अडकलेले असे लोक घेऊन तुम्ही पळून गेलात. मग तुमच्यात एवढी ताकद होती तर परत तुम्हाला मुख्यमंत्रीपद का नाही मिळाले? मुख्यमंत्रीपदाचे तुम्हाला वचन दिले होते मग तुम्ही मुख्यमंत्री का झाला नाहीत.

एकनाथ खडसे यांच्या जावयाला रेव्ह पार्टीत पकडण्यात आलं. ही संपूर्ण बाब मला संशयास्पद वाटतं. खडसे यांच्या जावयावर चार दिवस वॉच होता म्हणे. एवढा वॉच पहलगामध्ये ठेवला असता तर ते अतिरेकी पळून गेले नसते, ती घटनाच घडली नसती आणि 26 महिलांचे कुंकू पुसले गेले नसते. गिरीश महाजन यांच्या चेहऱ्यावर असूरी आनंद होता. गिरीश महाजन यांच्या चेहऱ्यावरचा असूरी आनंद जर तुम्ही पाहिला असेल तर यामागे काय घडलं काय घडवलं हे तुम्हाला लक्षात येईल. एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक झाली तर गिरीश महाजनांना एवढा आनंद का झाला? आपण मंत्री आहोत याचे भान गिरीश महाजनांना नाहीये. महाजन हे मंत्रिमंडळातले सुटलेले वळू आहेत. आणि हाच फडणवीसांना अडचणीत आणणार. दरोडेखोर, बलात्कारी, गुंडांना घेऊन त्यांनी पक्ष चालवण्याचा प्रयत्न केला. त्यांना आता रवींद्र चव्हाणांची साथ मिळते. नैतिकता या राज्याच्या राजकारणात राबूच नये अशा प्रकारची भूमिका भाजपच्या या लोकांनी घेतलेली आहे. काल जो रेव्ह पार्टीचा प्रकार झाला तो खरा असेल तर निष्पक्ष चौकशी करून त्यात कठोर कारवाई व्हायची होईल ती होईल. पण गिरीश महाजनांची देहबोली अशी होती की ते फक्त नाचायचे बाकी होते. महाराष्ट्राच्या राजकारणात आम्ही पथ्य पाळतो की किमान कुटुंबापर्यंत आम्ही पोहोचत नाही. दुर्दैवाने भाजपचे लोक कुटुंबापर्यंत पोहोचायला लागले आहेत आणि त्यांना बदनाम करायला लागले आहेत. खडसे गेल्या तीन दिवसांपासून हनी ट्रॅपवर बोलत आहेत. हनी ट्रॅपप्रकरणी काहींना अटक झाली आहे, त्यांची नीट चौकशी व्हावी मागणी खडसेंनी केली आहे. त्या हनी ट्रॅपवरून गिरीश महाजनांचा असलेल्या सहभागावरून बोलत आहेत, त्यावर तपास नाही, त्यावरून धाडी पडत नाहियेत. त्या संदर्भात पोलिसांना जाग नाही. त्यासंदर्भात खडसे बोलत आहेत म्हणून खडसेंच्या जावयाला उचलले आहे. हे महाराष्ट्रात सर्वत्र सुरू आहे. जे लोक भाजपच्या विरोधात बोलले पोलीस त्यांच्या घरात जात आहेत. पोलीस भाजपचे चाकर झाले आहेत. आणि भारतीय जनता पार्टीच एक गुंडांची रेव्ह पार्टी झाली आहे. अख्ख्या पक्षच रेव्ह पार्टीचा मोहोल आहे. खोटे आरोप करायचे, खोटे गुन्हे दाखल करायचे आणि लोकांना त्रास द्यायचा. मग बलात्काराचे गुन्हे दाखल होत आहेत, मग रेव्ह पार्टीचे गुन्हे दाखल होत आहेत, खुनाचे खोटे गुन्हे दाखल होत आहेत. पोलिसांना लाज वाटली पाहिजे, निष्पक्षपातीपणाची तुम्ही शपथ घेतली आहे असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

एकनाथ खडसे यांचे तोंड बंद करण्यासाठी त्यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. या आधी नवाब मलिक यांच्या जावयाला अशाच प्रकारे अटक करण्यात आली होती. समीर खानला अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी अटक केली होती. पण त्याच्याकडे असं काही नव्हतं. त्याच्याकडे सुगंधी तंबाखू आढळली होती त्यावर भारतात बंदी आहे. या प्रकरणी त्यांना सहा महिने तुरुंगात ठेवलं होतं. आर्यन खान, शाहरुख खानच्या मुलाला अशाच अधिकाऱ्यांनी अटक केलं होतं. महाराष्ट्रात काय सुरू आहे. त्याच सरकारनं, त्याच विभागानं रेव्ह पार्टीत धाड घातली. अहिल्यानगरमध्ये आमचे शहरप्रमुख कल्याण काळेवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी अहिल्यानगरमधील आमदार संग्राम जगताप आणि महानगरपालिकेतला 450 कोटी रुपयांचा घोटाळा समोर आणून मोठे जनआंदोलन उभारले होते. 24 तासांत पहाटे तीन वाजता बलात्काराच्या खोट्या गुन्ह्याखाली कल्याण काळेंना अटक झाली. हे फडणवीसांच्या पोलिसांचे कर्तृत्व आहे. गृहमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे महाराष्ट्रात काय चाललंय? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.