
एका लोकप्रतिनीधीचे निधन झाल्यास त्या ठिकाणी बिनविरोध पोटनिवडणूक घेण्याची महाराष्ट्राची परंपरा होती ती भाजपने मोडली अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी मिंधे गटाची डेडबॉडी केली आहे अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, बारामती पोटनिवडणुकीबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा सुद्धा झाली. तरीही सपकाळ म्हणाले की महाराष्ट्राची संस्कृती वगैरे, वगैरे. त्यानुसान काँग्रेसने माघार घेतली असेल तर त्यांच्या भुमिकेचे स्वागत केले पाहिजे. पण ही एकच निवडणूक असते की कुणाच्या मृत्यू नंतर पोटनिवडणूक झाली तर ती बिनविरोध होते, पण ही परंपरा भाजपने मोडली. म्हणून ही निवडणूक अजित दादांना श्रद्धांजली म्हणून अर्पण केली पाहिजे. आणि पुढच्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून विचार करता येईल. आणि महाविकास आघाडी म्हणूनच आम्हाला लढावं लागेल असे संजय राऊत म्हणाले.
राहुरी आणि बारामतीची निवडणूक वेगळी आहे. अशा प्रकारचा सुसभ्यपणा, सुसंस्कृतपणा भाजपने कधीच दाखवलेला नाही. सुसभ्यपणा, सुसंस्कृतपणाशी भाजपचा अशा प्रकारे कधी संबंध आलेला नाही. मग ती पंढरपूरची पोटनिवडणूक असेल किंवा नांदेडची पोटनिवडणूक असेल. त्यामुळे बारामती अपवाद आहे. मुळात कुठलीही निवडणूक बिनविरोध होता कामा नये. तरीही बारामती आपण अपवाद करतोय असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
ऑपरेशन टायगरप्रकरणी संजय राऊत म्हणाले की, ऑपरेशन हे एकदाच केलं जातं. वारंवार एका शरीराचं ऑपरेशन करतात असं म्हणतात तेव्हा ते मृतदेहाचं ऑपरेशन असतं. देवेंद्र फडणवीस यांनी मिंधे गटाची डेडबॉडी केली आहे. देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे ऑपरेशन करत आहेत. शिवसेनेचे 9 खासदार हे एकजुटीने एकत्र आहेत. काही नावं मी वाचली तेव्हा मला हसायला आलं. अत्यंत हास्यास्पद आणि मुर्खपणाचं ही बाब आहे. ज्या कुणी ही बातमी दिली आहे त्याने स्वतःचं हसं करून घेणारी ही बातमी आहे. उद्या माझं आणि आदित्य ठाकरे यांचंही नाव त्यात टाकतील. वातावरण गरम करण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जात आहेत. किंवा काहीतरी घडामोडी करत आहोत हे दाखवण्यासाठी ही पत्रकारिता पूर्णपणे चुकीची आहे असेही संजय राऊत म्हणाले.




























































