
शिवसेना आणि मनसेत कुठलेही वाद नाही सर्वकाही सुरळीत आहे असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच मुंबईची ही लढाई अदानी यांच्या मुंबई ताब्यात घेण्याच्या प्रयत्नाविरुद्ध असा घणाघातही संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत म्हणाले की मनसे आणि शिवसेनेच्या बैठका या होतच असतात. आमचे लोक राज ठाकरे यांना भेटायला जातात, मनसेचे लोक मातोश्रीवर येतात. यात काहीही नवीन नाही, कोणताही तिढा किंवा पेच नाही. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जागांवरून वाद आहे, असे तुम्ही म्हणत असाल तर तसे काहीही नाही, सर्व काही सुरळीत आहे आणि ते लवकरच दिसेल असे संजय राऊत म्हणाले.
आमच्या दोन्ही पक्षांत जागांचा प्रश्न तितका महत्त्वाचा नाही, हे स्वतः माननीय राज ठाकरे यांनी वरळीतील पत्रकार परिषदेत सांगितले आहे. जागा किती आणि आकडा किती, यामध्ये कोणीच पडत नाही. शेवटी जे काही ठरले जाणार आहे ते शिवसेना आणि मनसे या एका कुटुंबात ठरणार आहे. दादर, माहीम, भांडूप, विक्रोळी, मुलुंड या ठिकाणी जर आमच्यात काही प्रश्न असतील तर आम्ही ते सोडवायला सक्षम आहोत. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आहेत, काही जणांना निवडणूक लढवायची इच्छा असते, त्यांना समजावं लागतं की यावेळी मुंबईची लढाई ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची आणि अस्मितेची लढाई आहे. कार्यकर्ते हे समजून घेत आहेत आणि सर्व काही चांगल्या पद्धतीने चालले आहे, कोणी कोणाकडे जाऊन रडत नाही असेही संजय राऊत म्हणाले.
निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असेल त्या दिवशी कोण कुठून लढणार हे स्पष्ट होईल. आमच्या पक्षात आणि राज ठाकरे यांच्या पक्षात कोण काय करणार आहे याबाबत पूर्ण समन्वय आहे. नेत्यांमध्ये चांगला संवाद आहे. आम्ही एकमेकांकडे कधीही जाऊन चर्चा करू शकतो, बोलू शकतो. शिवसेना-मनसे युतीमध्ये कोणताही तणाव नाही.
मुंबईवर ज्या पद्धतीने एका उद्योगपतीचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे, जो मोदींचा आणि भाजपचा मित्र आहे, त्याला आमचा तात्त्विक आणि नैतिक विरोध आहे. मुंबईची ही लढाई गौतम अदानी यांच्या मुंबई ताब्यात घेण्याच्या प्रयत्नाविरुद्ध आहे. भाजपच्या मदतीने मुंबई गिळण्याचा प्रयत्न केला जातो आहे. इतर अनेक उद्योगपती मुंबईत होते, टाटा, बिर्ला, अंबानी, अनेक बिल्डर्स आले, पण ज्यापद्धतीने अदानींना मुंबई गिळण्यासाठी उत्तेजन दिले जात आहे, ते मुंबई आणि मराठी माणसासाठी अत्यंत घातक आहे.
शरद पवार आणि गौतम अदानी यांचे संबंध हे राजकीय नाहीत, तर वैयक्तिक आणि कौटुंबिक आहेत. आपल्या कार्यक्रमाला कोणाला बोलवायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यांनी गौतम अदानींना बोलावले असतील आणि त्यासाठी पवारांचे संपूर्ण कुटुंब, ज्यांनी पक्ष फोडला ते अजित पवारही उपस्थित असतील, तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पवारांचा पक्ष फोडण्यामध्ये गौतम अदानी यांच्या भावाचा सहभाग होता, अशी माझी त्यावेळची माहिती होती. अजित पवारांना पक्षातून फोडण्यात अदानी होते, अशी माहिती मी तेव्हा ऐकली आणि वाचली होती. आता त्याचे खरं-खोटं तेच सांगू शकतील असेही संजय राऊत म्हणाले.



























































