जय शहांना या देशाचा नागरिक म्हणवून घेण्याचा नैतिक अधिकार आहे का? संजय राऊत यांचा संतप्त सवाल

अंधभक्तांना भारत पाक सामना पाहता यावा म्हणून पंतप्रधान मोदींनी पाच वाजता भाषण केलं अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच जय शहांना या देशाचा नागरिक म्हणून घेण्याचा नैतिक अधिकार आहे का? असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान मोदी एरवी 8 वाजता बोलतात. त्यांची आठची वेळ देशाला धक्का देण्याची वेळ आहे. काल पाच वाजता का बोलले? देशाने हिंदुस्थान पाकिस्तान सामना पहावा यासाठी पंतप्रधान मोदी यांनी देशाला पाच वाजता संबोधित केले. म्हणजे हे किती महान राष्ट्रभक्त आहेत. हा सामना अंधभक्तांना आणि भाजप समर्थकांना पाहता यावा यासाठी ते पाच वाजता जीएसटीबाबत बोलले. पंतप्रधान यांनी जीएसटीमध्ये सूट दिल्याचे सांगितले. त्यामुळे सणा सुदीत स्वस्ताई येईल असं सांगितलं. पण ते खोटं आहे. मोदींनी साधारण दोन लाख कोटी रुपयांची ही सवलत दिली आहे. 140 कोटी हिंदुस्थानी नागरिकांना वर्षाला 1213 रुपये वाचणार आहेत. आणि महिन्याला 110 ते 120 रुपये वाचणार आहेत. हे सगळं करण्यापेक्षा पंतप्रधान मोदींना आमचे 15 लाख रुपये दिले असते तर ते अधिक सोयीचं ठरलं असतं. हे मुर्ख बनवण्याचे धंदे आहेत असेही संजय राऊत म्हणाले.

काल जय शहा मुंबईत होते अशी माझी माहिती आहे. बीसीसीआयची निवडणूक होती. त्या संबंधित प्रक्रिया त्यांना मुंबईत येऊन पूर्ण करायच्या होत्या. काल भारत पाकिस्तान सामना खेळला गेला, त्यातले एक चित्र प्रसिद्ध झाले आहे. साहिबजादा फरहान नावाचा पाकिस्तानी खेळाडू आहे. आमचे साहेबजादे आणि अमित शहाचे शहझादे एकच आहेत ते. साहिबजादा फरहानचे अर्धशतक झाल्यावर क्रिकेटच्या मैदानावर AK 47 प्रमाणे हातात बॅट घेऊन अॅक्शन केली. त्याने दाखवलं की अशाच प्रकारे AK 47 चा वापर करून पाकिस्तानी अतिरेक्यांनी पहलगाममध्ये तुमच्या 26 निरपराध्यांना ठार केलं. हे त्यानं प्रतीकात्मकरित्या दाखवलं. आणि जय शहासह संपूर्ण भारतीय संघ ते थंडपणे पाहत होता. पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सुर्यकुमार यादव याने म्हणे पाकिस्तान क्रिकेट टीमच्या कॅप्टनशी हस्तादोंलन केले नाही. मग सुर्यकुमार यादवने त्या साहिबजादाच्या तिथेत कमरेत लाछ घालायला हवी होती. अमित शहा आणि जय शहा यांच्यामुळे हे सगळं देशाला सहन करावं लागतं. एवढं महान कार्य ते करत आहेत, जय शहाला भारतरत्न दिलं पाहिजे.

26 निरपराध्यांची हत्या झाली, त्यांच्या पत्नीच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं. तुम्ही ऑपरेशन सिंदूर केलंत. राष्ट्रभक्तीची मोठ मोठी भाषणं करत तुम्ही मतं मागितली. मग पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यामागे प्रयोजन काय? हे कुणासाठी खेळताय? कुणाचा जुगार सुरू आहे, हे आम्हाला एकदा कळू द्या. काल क्रिकेटच्या मैदानावर क्रिकेटपटूने आम्हाला खिजवलं, आमच्या शहीदांचा, मृत नागरिकांचा अपमान केला. आणि भारतीय क्रिकेट संघ शाब्दिक चकमकीत अडकून पडला आहे. शेकहँड केले नाही हे अंधभक्ताच्या गोष्टी आम्ही ऐकतोय. आपल्या खेळाडूंनी बाहेर पडायला पाहिजे होतं. या देशाचा नागरिक म्हणवून घेण्याचा जय शहांना नैतिक अधिकार आहे का? का तुमच्या राष्ट्रभक्तीचा गुजरात पॅटर्न आहे का? इतरांनी मरायचं आणि गुजरातवाल्यांनी कमवायचं असा काही पॅटर्न आहे का? हे जर इतर राज्यात घडलं असतं तर भारतीय जनता पक्ष थयथयाट करत बाहेर आला असता. साधा निषेधाचा एक सूर तरी निघाला? पाकिस्तानचा निषेध करायलाही भाजपचे लोक घाबरत आहेत. आता जय शहांनी सांगावं की अमित शहा महान आहेत की अतिमहान आहेत असे संजय राऊत म्हणाले.

भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळू नये अशी 140 कोटी जनतेची मागणी आहे. जय शहाने ते ठरवलं तर ते करू शकतात. जर त्यांचे वडिल कलम 370 हटवू शकतात तर जय शहा पाकिस्तानवर बंदी घालू शकतात. भारत पाकिस्तान सामन्यावर सर्वात मोठा सट्टा भारतात खेळला जातो. पहिल्या सामन्याला दीड लाख कोटींचा सट्टा खेळला गेला. आणि हा सट्टा गुजरातमध्ये खेळला जातो. त्यातले 25 हजार कोटी रुपये सरळ पाकिस्तानात जातात. आणि कालच्या सामन्यावरही दीड ते दोन लाख कोटी रुपयांचा सट्टा खेळला गेला. त्यातली मोठी रक्कम पाकिस्तानला जाते आणि त्याच पैश्यांवरून आमच्या निरपराध लोकांवर गोळ्या चालवल्या जातात असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.