“महाराष्ट्रात ‘फडणवीस अ‍ॅक्ट’ लागू, समज देऊन सोडून द्यायचं अन् बाकीच्यांना…” संजय राऊतांचा घणाघात, राष्ट्रपतींची भेट घेण्याचा इशारा

महाराष्ट्रामध्ये नवीन फडणवीस अ‍ॅक्ट आला आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. बाकी सगळ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, त्यांना जनसुरक्षा कायद्याखाली, भ्रष्टाचार विरोधी कायद्याखाली अटक होईल. पण मंत्रिमंडळातील जे अपराधी आहेत. ज्यांची जागा तुरुंगात असायला हवी, त्यांना फक्त समज देऊन माफ केले जाईल. वाशिंग मशीननंतर महाराष्ट्रात आता हा नवीन फडणवीस अ‍ॅक्ट लागू झाला आहे, असा हल्लाबोल राऊत यांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना केला.

वसई-विरारच्या तत्कालीन आयुक्तांवर ईडीची धाड पडली. त्यांना त्या पदावर नियमबाह्य पद्धतीने बसवण्यात आले होते. दादा भूसे यांचा त्यांच्यासाठी आग्रह होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना ती नेमणूक व्हावी अशी त्यांची भूमिका होती, पण एकनाथ शिंद यांनी त्यांची इच्छा पूर्ण केली. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने नियुक्त केलेल्या आयुक्तांवर ईडीच्या धाडी पडल्या याचा अर्थ धाडीचे धागेदोरे संबंधित मंत्र्यापर्यंत जावू शकतात. तो अधिकारी नेमण्याचे काम दादा भूसे यांनी केल्याची तेव्हाही आणि आजही चर्चा आहे, असेही राऊत म्हणाले.

काल देवेंद्र फडणवीस यांनी काही मंत्र्यांना समज दिली आणि सोडून दिले. महाराष्ट्रात हा नवीन फडणवीस अ‍ॅक्ट आला आहे. बाकी सगळ्यांवर कायदेशीर कारवाई होईल. जनसुरक्षा कायदा, भ्रष्टाचार विरोधी कायद्याखाली अटक होईल. पण मंत्रिमंडळात जे अपराधी आहेत. माणिक कोकाटे, संजय शिरसाट, संजय राठोड किंवा अन्य कुणी असतील… ज्यांची जागा तुरुंगात असायला हवी ते मंत्रिमंडळात आहे. याचे कारण महाराष्ट्रात फडणवीस अ‍ॅक्ट लागू आहे. आधी वाशिंग मशीन, मग फडणवीस अॅक्ट. समज द्यायची आणि माफ करायचे, अशी टीका राऊत यांनी केली.

मिंध्यांचे मंत्री किंवा त्यांच्या जवळच्यांवर कारवाई केली जात आहे का? असे विचारले असता राऊत म्हणाले की, नक्कीच तसेच दिसते, पण या क्षणी यावर मत व्यक्त करणे योग्य नाही. कारण हे सगळे दबावाचे राजकारण आहे. आताही बऱ्याच लोकांना अटक केलेली आहे. झारखंड मद्य घोटाळ्यातील अमित साळुंके असो किंवा काल वसई-विरारच्या तल्कालिन आयुक्तांवर पडलेली धाड असो, हे सगळे पाहता मिंधे गटाच्या लोकांना कुणीतरी इशारा देतंय की, फार हालचाल कराल तर याद राखा. सगळ्या फाईली टेबलावर आहेत. पण त्या टेबलावरच्या फाईल पोलिसाकंडे केव्हा जाणार हे पहावे लागेल, असेही राऊत म्हणाले.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे काही सेकंद नाही तर 20-22 मिनिटं पत्ते खेळत होते असा विधिमंडळाचा चौकशी अहवाल आहे. पण अशा अहवालांना देवेंद्र फडणवीस किंवा विधानसभेचे अध्यक्ष किती किंमत देतात? अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्या पीएला धुळ्यामध्ये त्यांच्या खोलीत दीड कोटींसह पकडले. त्याच्या आधी 10 कोटी रुपये धुळ्यातील ठेकेदाराने गोळा करून जालन्याला पाठवले. कोणासाठी पाठवले? त्याची सुद्धा चौकशी नेमली, पण पुढे काय झाले? फडणवीस कारवाईच्या घोषणा करतात, एटीएस स्थापन करता,  पण पुढे काय होते? अंदाज समितीचा अध्यक्ष हा लाचखोर आहे, हे उघड झाले असूनही त्याला फडणवीस आणि विधिमंडळाचे अध्यक्ष वाचवत आहेत. हा फडणवीस अ‍ॅक्ट आहे. आपल्या लोकांना वाचवायचे. समज द्यायची, सोडून द्यायचे आणि बाकीच्यांना तुरुंगात टाकायचे, असा घणाघात राऊत यांनी केला.

वादग्रस्त विधानं खपवून घेणार नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मंत्र्यांना सज्जड दम, मंत्रिमंडळात सुनावले खडेबोल

राष्ट्रपतींना भेटणार

मंत्री, आमदारांचे एकामागोमाग एक प्रकरण समोर येऊनही त्यांचे राजीनामे घेण्यात आलेले नाही. कारण सरकार निर्लज्ज आहे. सरकार निर्लज्ज असेल, भ्रष्टाचाराला पाठिंबा देत असेल तर राजीनामा कसा घेणार? याच संदर्भात काल विरोधी पक्ष राज्यपालांना जाऊन भेटला. तसेच सगळ्या भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या फाईल घेऊन आम्ही लवकरच राष्ट्रपतींना भेटणार आहोत. राज्यपाल कारवाई करत नसतील, राज्याचे मुख्यमंत्री भ्रष्टाचाऱ्यांना पाठिंबा देत असेल तर या गोष्टी राष्ट्रपतींच्या कानावर घालण्याचा पर्याय आमच्याकडे आहे, असे राऊत म्हणाले.

कृष्णा आंधळेचे काय झाले?

50 वर्षांपूर्वी जब्बार पटेल यांचा सामना चित्रपट आला होता. डॉ. श्रीराम लागू, निळू फुले त्यात होते. त्याच्यामध्ये एक प्रश्न होता की, मारुती कांबळेचे काय झाले? तसा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे की, संतोष देशमुख प्रकरणातील कृष्णा आंधळेचे काय झाले? तो मुख्य साक्षीदार असून त्याला कुठे गायब केले? त्याला मारले की त्याची हत्या झाली? काय ते कळू द्या, असेही राऊत म्हणाले.

कोकाट्यांचा राजीनामा नाहीच, अजितदादा म्हणतात, आधी शिंद्यांच्या मंत्र्यांचा राजीनामा घ्या, मग बघू!