महाराष्ट्राच्या राजकीय जीवनातला काळा दिवस; अजित पवारांशिवाय राज्याचं राजकारण बेचव आणि अळणी! – संजय राऊत

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीत झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर शोककळा पसरली असून महाराष्ट्राच्या राजकीय जीवनातला काळा दिवस असल्याची प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली. अजित पवारांशिवाय राज्याचं राजकारण, समाजकारण बेचव आणि अळणी होईल, असे ते बुधवारी सकाळी माध्यमांशी बोलताना म्हणाले.

संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातला काळा दिवस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुंबईतून बारामतीत घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात झाल्याची बातमी कळली तेव्हा आम्ही सगळे प्रार्थना करत होतो ते सहीसलामात बाहेर यावे अशी आम्ही प्रार्थना करत होतो. पण दुर्दैवाने ही धक्कादायक दु:खद बातमी कानावर आदळली. अजित पवारांशिवाय महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण बेचव आणि अळणी होईल. त्यांचे व्यक्तिमत्व आपण गेल्या अनेक वर्षांपासून पाहतो. दिलखुलास, रोखठोक, कार्यकर्त्यांना हवाहवासा वाटणाऱ्या नेत्याच्या जाण्याने महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे बोलणे, कामाची पद्धत, त्यांची प्रशासनावरील पकड या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या मनात कायम राहतील. बारामती आणि अजित पवार यांचे एक नाते होते. त्याच बारामतीत त्यांना मृत्यू यावा हा एक विचित्र योगायोग आहे. त्यांना कधी श्रद्धांजली वाहावी लागेल असे मनात आले नाही.

अजित पवार यांनी त्यांच्या पद्धतीचे राजकारण केले. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात ते उपमुख्यमंत्री होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचे म्हणणे होते की, कॅबिनेटला पूर्ण तयारी करून येणारे ते मंत्री होते. राज्याच्या प्रश्नांचा त्यांना अभ्यास विशेषत: पाटबंधारे यासंदर्भात त्यांचा अभ्यास पक्का होता. शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे काम राहिले, असे संजय राऊत म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, शरद पवारांनी त्यांना राजकारणात आणले. नंतर गेल्या दोन अडीच वर्षापासून त्यांनी शरद पवारांशिवाय राजकारण सुरू केले. त्या राजकारणाचा असा अकाली अंत होईल असे कुणाच्या ध्यानीमनी नव्हते. अत्यंत कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यांना मिळालेले प्रत्येक पद त्यांनी हे राजकारणासाठी वापरलेच, पण कार्यकर्ते, जनतेसाठी, विकासासाठी त्यांनी वापरले. अजित पवारांच्या कामाच्या पद्धतीविषयी अनेकदा टीव्ही चॅनेलवर काही दृश्य आम्ही पाहिले. त्यांच्या बोलण्यात कधी राग, चीड आली तरी एखादे विनोदी वाक्य टाकून संपूर्ण वातावरण हसरे, खेळते ठेवण्याचे कसब त्यांच्याकडे होते. ते उत्तम वक्ते होते. आज महाराष्ट्र खरोखर दु:खात आहे.

महाराष्ट्रात कोणते संकट आले, काय ग्रह फिरले माहिती नाही. गेल्या काही काळापासून महाराष्ट्रातील प्रमुख नेतृत्व आपल्यापासून हिरावून घेतले. विलासराव देशमुख, गोपिनाथराव मुंडे उमद्या वयात गेले आणि आता अजित पवार गेले. विक्रमी वेळा ते उपमुख्यमंत्री झाले. त्यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती. ते मुख्यमंत्री झाले असते तर महाराष्ट्राला उत्तम कार्यक्षम मुख्यमंत्री मिळाला असता. पण दुर्दैवाने ते होऊ शकले नाहीत आणि या भीषण विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. महाराष्ट्राला आणखी काय पहावे लागणार सांगता येत नाही. मी शिवसेना परिवारातर्फे त्यांना श्रद्धांजली वाहतो. उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली, ते अस्वस्थ आणि शोकात आहेत. कारण ते त्यांचे सहकारी होते. पवार कुटुंब, शरद पवार, अजित पवार यांचे आणि ठाकरे कुटुंबाचे स्नेहाचे संबंध होते, असेही संजय राऊत म्हणाले.

Baramati Plane Crash: अजित पवार यांचे दुर्दैवी निधन; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला शोक