
शरद पवार यांची राज्यसभा खासदारकीची मुदत संपत आहे आणि पुन्हा शरद पवार राज्यसभेवर जाणार का? यावर चर्चांना उधाण आले आहे. अशातच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. शरद पवार ज्या दिवशी ठरवतील त्यांना निवडणूक पुन्हा लढायची आहे, त्यावेळी पवार साहेंबासारख्या नेत्याला निवडून आणण्याची तेवढी ताकद महाविकास आघाडीकडे आहे, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. तसेच शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ओरिजनल राष्ट्रावादी काँग्रेस पार्टी ही महाविकास आघाडीचा अजूनही घटक आहे. बाकी सगळे हवाबाजी आणि पतंगबाजी आहेत, अशी सडकून टीका यावेळी संजय राऊत यांनी केली.
संजय राऊत म्हणाले की, शरद पवारांसारखा नेता सगळ्यांसाठी महाराष्ट्रासाठी दिल्लीत असणे आवश्यक आहे. हे मी स्वत: पवार साहेबांशी बोललेलो आहे. आमच्या दोघांमध्ये यावर वारंवार चर्चा झाली. पवार साहेबांची एकंदरीत अशी मानसिकता दिसली की, आता थांबायला पाहिजे. पण आम्ही जे त्यांचे चाहते आहोत, आम्ही त्यांना सांगितले त्यावेळी माझ्यासोबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा होते. तुमच्यासारखा नेता दिल्लीत असणं म्हणजे महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहे. शरद पवार ज्या दिवशी ठरवतील की त्यांना निवडणूक पुन्हा लढायची आहे. महाविकास आघाडीकडे पवार साहेंबासारख्या नेत्याला निवडून आणण्य़ाची तेवढी ताकद आहे. आमच्याकडे तेवढी मतं जरुर आहेत. त्यामुळे पवार साहेबांसारख्या नेत्याला कोणापुढे हात पसरायची गरज नाही. महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान या अनेक गोष्टी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरीने त्यांच्याभोवती आहेत. त्यामुळे शरद पवार जर निवडणुकीला उभे राहणार असतील तर, त्यांनी राहावं, अशी आमची अपेक्षा आहे. आमच्याकडे महाविकास आघाडीकडे जेवढे आहे, त्या मतांपेक्षा जास्त कोटा आमच्याकडे आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि इतर काही लोकं, त्यांनी कितीही त्याच्यामध्ये अपशकुन करण्याचा प्रयत्न केला. विशेष करून दिल्लीमधून तरी तो यशस्वी होणार नाही, पवारसाहेबांची लढण्याची इच्छा असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर आहोत, असे संजय राऊत म्हणाले.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे या महाराष्ट्रातील राजकारणातील प्रमुख स्तंभ आहेत. त्यांच्यासमोर सर्व ज्युनिअर आहेत. लोकं सत्तेवरती बसल्यावर त्यांना अकलेची शिंग फुटतात. कोणी मुख्यमंत्री झाल्यावर तर कोणी मंत्री झाल्यावर पवारसाहेबांना सल्ले देण्याचा प्रयत्न करतात. खासकरून भाजपचे सध्याचे मुख्यमंत्री. हातात सत्ता आहे म्हणून तुम्हाला शिंग फुटली आहेत. नाहीतर शरद पवार यांनी केलेले काम आणि राजकारणातील त्यांचा अनुभव हा प्रचंड आहे, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी फटकारले.
सुनील तटकरे म्हणतात, मला 2022, 2023 आणि 2024 मध्ये खलनायक ठरवण्याचा वारंवार प्रयत्न केला गेला. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. इतिहासाची चिंता कोणी करू नये, कारण इतिहास घडवण्यासाठी क्षमता असावी लागते. पक्षांतर करणे म्हणजे इतिहास घडवणे होत नाही. पक्षांतर करणं आणि सत्तेत सहभागी होण्यासाठी गोलांट्या उड्या मारणं. हे माझं व्यक्तीगत विधान नाही. त्याला कोणी इतिहास घडवला असे बोलू नये. इतिहास घडवण्यासाठी फार वेगळी व्यक्तीमत्व निर्माण व्हावी लागतात. सुनील तटकरे आणि त्यांच्या लोकांनी आत्मचिंतन केले पाहिजे, लोकं आपल्याविषयी असे का बोलतात? असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.


























































