बिहार निवडणूक निकालावर संजय राऊत यांचं ट्विट, एकदम महाराष्ट्र पॅटर्न!

बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून आतापर्यंत आलेल्या कलांनुसार राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसते. दोन टप्प्यात पार पडलेल्या या निवडणुकीत एनडीएने 190 हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे, तर महागठबंधनला 50 जागाही मिळालेल्या नाहीत. या निकालावर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बिहारच्या विधानसभा निवडणुका निकालाने धक्का बसण्याची गरज नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर निशाणा साधला.

संजय राऊत यांनी एक्सवर एक पोस्ट करत बिहार विधानसभा निवडणुकीवर प्रतिक्रिया दिली. “बिहारच्या विधानसभा निवडणुका निकालाने धक्का बसण्याची गरज नाही. निवडणूक आयोग आणि बीजेपी यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते! एकदम महाराष्ट्र पॅटर्न! जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती त्यांना ५० च्या आत संपवले!”, असे ट्विट संजय राऊत यांनी केले.