सरकारचे अनैतिक, असमतोल पद्धतीने निधीवाटप म्हणजे लोकशाही आणि संविधानासाठी घातक पायंडा – संजय राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्याचे सरकार हे अत्यंत अनैतिक, असमतोल पद्धतीने निधीवाटप करतंय, हे लोकशाही आणि संविधानासाठी घातक पायंडा असल्याची जोरदार टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ”हे राज्य सर्वांचे आहे, राज्याचा विकास हा समतोल पद्धतीने व्हायला हवा मात्र सरकारकडून तसे होत नसल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.

विदर्भ आणि मराठवाडा यांसारख्या भागांमध्ये विकासाचा मोठा ‘बॅकलॉग’ आहे. जिथे विकास रखडला आहे, तिथे सर्वाधिक मदत करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. ज्या मतदारसंघांमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष , विरोधी पक्षाचे आमदार असतील तर त्यांच्या माध्यमातून देखील तो विकासनिधी विकासकामासाठी उपलब्ध होणं गरजेचं आहे. सगळ्यांचे राज्य एकच आहे, त्यामुळे जिथे गरज आहे तिथे निधी मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

केवळ राजकीय आकसापोटी विरोधी पक्षांच्या आमदारांना निधीपासून वंचित ठेवणे हे लोकशाहीच्या तत्त्वांना हरताळ फासणारे आहे. विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी समतोल धोरण राबवणे गरजेचे आहे. मात्र सध्याचे सरकार हे अत्यंत अनैतिक पद्धतीने, असमतोल पद्धतीने निधीवाटप करतंय हे लोकशाही आणि संविधाना साठी घातक पायंडा असल्याची टीका संजय राऊत यांनी केली.

सर्वांनी कर्नाटक विधानसभा अध्यक्षांचा आदर्श घ्यावा

एकिकडे लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव येतो मात्र कर्नाटकात सरकार प्रश्नांची उत्तर देण्यात अपयशी ठरल्याने नाराज विधानसभा अध्यक्ष यू.टी. खादर यांनी सभागृह तहकूब केलं आणि मुख्यमंत्र्यांना याबाबत जाब विचारला. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष आणि लोकसभा अध्यक्षाचं काम तेच आहे. मुळात त्या पदावर बसलेली व्यक्ती निष्पक्ष असावी लागते. तुम्ही जरी एका पक्षाकडून निवडून आला असाल आणि त्या पदावर बसला असाल तेव्हा तुम्ही निष्पक्ष असता तेव्हा तुम्हाला सरकार पक्षासह सर्व पक्ष समान असतात, असं मी अनेकदा लोकसभेत पाहिले आहे, खासकरुन सोमनाथ चटर्जी , शिवराज पाटील , पी.ए. संगमा त्या पद्धतीने काम करत होते. मात्र आता विधानसभांचे अध्यक्ष महाराष्ट्राचे असतील किंवा लोकसभेचे असतील ते पूर्ण राजकीय दृष्टीकोनातून काम करतात म्हणून कर्नाटक विधानसभा अध्यक्षांचा आदर्श हा सर्वांनी ठेवायला पाहिजे.