“…म्हणून तीन वर्ष तारीख पे तारीख”, सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या मिंधेंसोबतच्या फोटोवर संजय राऊतांचा निशाणा

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या सुनावणीवर सर्वोच्च न्यायालयात ‘तारीख पे तारीख’ सुरूच आहे. कोर्टानेच दोन दिवसांची तारीख, पाच तासांचा वेळ आणि त्या वेळेचे पक्षकारांसाठी विभाजन असे सुनावणीचे शेड्युल निश्चित केले होते. मात्र आज शिवसेनेचे प्रकरण तातडीने सुनावणीसाठी घेण्यास न्यायालयाने नकार दिला. वकिलांनी आग्रही विनंती करताच न्यायालयाने चार आठवड्यांनंतर सुनावणी घेण्याची तयारी दर्शवली. कोर्टात हे प्रकरण सुरू असतानाच सरन्यायाधीश मुंबईत आले होते आणि त्यांचे स्वागत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला.

सरन्यायाधीश हे एका कार्यक्रमासाठी मुंबईत आले होते. यावेळी मुंबई विमानतळावर एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले आणि याचे फोटो समाज माध्यमावर टाकले. याची पोस्ट रिशेअर करत “म्हणून तीन वर्ष तारीख पे तारीख”, असे एका ओळीचे कॅप्शन देत संजय राऊत यांनी टीका केली.