
गिरीश महाजन गुंड टोळ्या चालवतात. त्यांची 100 प्रकरणं माझ्याकडे आहेत. ते कशा प्रकारे पोलिसांवर दबाव आणतात, गुंड टोळ्या चालवतात आणि गुंडांना प्रवेश देतात याचा संपूर्ण चार्ट माझ्याकडे आहे, अशा गौप्यस्फोट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. शुक्रवारी सकाळी माध्यमांशी बोलताना राऊत यांनी नाशिकमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना भाजप प्रवेश देण्याच्या षडयंत्राचाही पुनरुल्लेख केला. याच संदर्भात राऊत यांनी गुरुवारी ट्विट केले होते. त्यानंतर टरकलेल्या भाजपने या पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश सोहळा थांबवला होता.
प्रवेश थांबावा म्हणून मी मत व्यक्त केले नाही. मी भाजपचा बुरखा फाडण्याचा प्रयत्न केला. नाशिकमध्ये नक्की काय घडले?तिथला एक व्यक्ती सातत्याने शिवसेनेचे प्रमुख नेते, स्थानिक नेत्यांवर समाज माध्यमावर गरळ ओक होता. अनेक तक्रारी देऊनही पोलीस दखल घेत नव्हते. आरटीआयच्या माध्यमातून ती व्यक्ती ब्लॅकमेलही करत होती. पोलीस दखल घेत नसतील आणि त्याचा समाजाला उपद्रव होत असेल तर शिवसैनिकांनी तिथे जाऊन त्याच्या कानफडात मारली असेल तर हा गुन्हा आहे का? पोलीस कारवाई करत नाही, सायबर सेल काय करतेय? असा सवाल राऊत यांनी केला.
या घटनेनंतर पोलिसांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांवर हत्येचा प्रयत्न ते दरोडेखोरीपर्यंतचे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर दबाव आणला. गिरीश महाजन यांच्या सांगण्यावरून हे सुरू होते. गुन्हे दाखल झाल्यानंतर हे पदाधिकारी अटकपूर्व जामीनासाठी फरार झाले. फरार असताना भाजपमध्ये प्रवेश केला तर आम्ही गुन्हे मागे घेऊ असे आमिष त्यांना दाखवण्यात आले. मग हे मंत्र्याच्या बंगल्यावर पोहोचतात. असेच एक दुसरे उदाहरण पुण्यात झाले.
पुण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या संदर्भात समाज माध्यमावर चुकीचे मत व्यक्त करणाऱ्या सोमण नावाच्या व्यक्तीला घरात घुसून मारले. नाशिकमध्ये असेच घडले होते. पण पुण्यात पोलिसांनी गुन्हाच घेतला नाही. तडजोडीने हे प्रकरण मिटवले. मग नाशिकचा कायदा वेगळा आणि पुण्याचा कायदा वेगळा आहे का? नाशिकमध्ये पोलिसांनी दहा ते बारा कलमे लावली. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मोक्का लावण्याची तयारी सुरू केलेली. त्यातून हे राजकीय प्रकार घडले. गिरीश महाजन हे राज्याचे गृहखाते चालवताहेत की गुंड टोळ्या? बागुल, राजवाडे फरार होते. मी ट्विट केले त्यात पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना टॅग केले. त्यानंतर तिथून विचारणा झाली आणि हे प्रवेश थांबवले, असेही राऊत म्हणाले.
राजकीय भविष्य संपणार म्हणून मिंधे गटाच्या पोटात भीतीचा गोळा, संजय राऊत यांनी फटकारले
दरम्यान, भाजपला मजबूत करायचे असेल तर बाहेरून येणाऱ्यांना घ्यावेच लागेल असा मतप्रवाह सत्ताधारी पक्षात आहे. याचाही राऊत यांनी समाचार घेतला. माझ्याकडे अशी माहिती आहे की, बाहेरून म्हणजे परदेशातून लोक त्यांच्या पक्षात प्रवेश करू इच्छित आहेत. त्याच्यामध्ये छोटा शकील, दाऊद, टायगर मेमन आहेत. त्या संदर्भात फडणवीस, महाजन, बावनकुळे यांची चर्चा सुरू आहे. दाऊदशी चर्चा करण्यासाठी गिरीश महाजन यांची नियुक्ती केली असेल, कारण त्यांना गुंडांशी बोलण्याचा अनुभव आहे, असा टोला राऊत यांनी लगावला.