
जनतेवर जेव्हा संकट येते तेव्हा भाजपचे ‘संकटमोचक’ गायब असतात, असा टोला शिवसेना नेते – खासदार संजय राऊत यांनी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना लगावला. जनता संकटात असते तेव्हा हे संकटमोचक आमदार पळवणे, नगरसेवक फोडणे, राजकारण करणे यात व्यस्त असतात, असा घणाघातही त्यांनी केला.
संजय राऊत यांच्या उपस्थितीत आज जळगावात शिवसेना पदाधिकाऱयांची बैठक झाली. बैठकीपूर्वी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. सरकार, पालकमंत्री, लोकप्रतिनिधींनी तातडीने शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी करणे गरजेचे होते. शेतकरी अडचणीत असताना महाजन कुठे आहेत? आमदार पळवणे हेच संकटमोचकाचे काम आहे का? अशी प्रश्नांची सरबत्तीच संजय राऊत यांनी केली.
जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाच्या कारभारावर खासदार संजय राऊत यांनी कडक शब्दांत टीका केली. ‘‘जिल्ह्यात राजकीय हुकूमशाही सुरू असून पोलीस वर्दीतले गुंड विरोधकांवर दडपण आणण्यासाठी वापरले जात आहेत. पोलीस गणवेशातील ही हुकूमशाही जनता खपवून घेणार नाही,’’ असा इशाराही त्यांनी दिला.
मिंधे गटाचे आमदार भाजपवासी होणार
जळगाव जिल्हय़ातील विशेषतः पारोळा आणि मुक्ताई नगरचे मिंधे गटाचे 25 ते 30 आमदार हे संकटमोचक अर्थात गिरीश महाजन यांच्या संपर्कात असून ते पुढची निवडणूक भाजपकडूनच लढतील, असा दावा संजय राऊत यांनी केला.
बारामती, राहुरीची निवडणूक एकत्र लढण्याचा प्रयत्न
बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याचा प्रयत्न करू, असे संजय राऊत म्हणाले. बारामती मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा अधिकार आहे. तेथे चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल. लोकशाहीत निवडणूक लढवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण महाविकास आघाडी एकजूट राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


























































