मोदींच्या संशोधनानुसार अदानींनी गटार गॅसवर गुंतवणूक करावी व त्याला मोदी गॅस असं नाव द्यावं, संजय राऊत यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा हिंदुस्थानातही मोठा परिणाम होताना दिसत आहे. या युद्धामुळे हिंदुस्थानातील LPG सिलेंडरच्या पुरवठ्यात कमी होऊ लागली आहे. अनेक भागात सिलेंडरसाठी रांगा लागलेल्या दिसत आहेत. गुरुवारी विरोधी पक्षाने संसदेत चूल मांडून मोदी सरकारविरोधात आंदोलन केले. देशभरात LPG सिलिंडरचा तुटवडा निर्माण झालेला असताना सरकार मात्र ते मान्य करायला तयार नाही. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

”LpG सिलेंडर बाबत सरकार खोटं बोलतेय. प्रधानमंत्री सांगतात LPG सिलेंडरचा तुटवडा नाही. सर्वकाही ठिकठाक आहे. पेट्रोलियम मंत्री देखील तेच बोलतायत. पण प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या प्रचारातून सुट्टी घेऊन जरा बाहेरची परिस्थिती बघावी. नोटबंदीनंतर आता पुन्हा तुम्ही लोकांना रांगेत उभे केले आहे आणि तुम्ही म्हणता की सर्व काही ठिकठाक आहे. तुमच्या घरात सर्व काही ठिक असेल, पण सामान्यांच्या घरात नाही. तुमच्या घरी इस्रायल किंवा अमेरिकेकडून सिलेंडर येत असेल. सामान्य कुटुंब, छोटे व्यावसायिक यांच्याकडची चूल मात्र पेटत नाहीए, जेवण बनत नाहीये”, अशी जोरदार टीका संजय राऊत यांनी केली.

”मोदीजींनी गटार गॅसचे एक संशोधन केलं होतं . गटारात पाईप टाका आणि त्यातून गॅस बाहेर काढा. त्यातून तुमची गॅसची गरज पूर्ण होईल. या संशोधनावर मोदीजींनी, भाजपच्या लोकांनी लक्ष दिले पाहिजे. लोकांना जर LPG मिळत नसेल तर त्यांच्या घराजवळ प्लांट उभा करून गटारातील गॅस लोकांना उपलब्ध करून द्यावा”, असा टोला त्यांनी लगावला.

पुढे ते म्हणाले की, ”गौतम अदानी टेक्सासमध्ये एका मोठ्या रिफायनरीत गुंवतणूक करत आहे. आता त्यांनी गुंतवणूक गटार गॅसमध्ये केली पाहिजे. सर्व मोठ्या उद्योजकांनी आता या गटार गॅसमध्ये गुंतवणूक करावी व त्या गटार गॅसच्या प्रोजेक्टला मोदी गॅस असं नाव द्यावं”, असा सणसणीत टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.