‘वेदांत’ खरेदी प्रक्रियेतून संजय शिरसाट यांची माघार, विरोधकांनी आरोप करताच टरकली

छत्रपती संभाजीनगर येथे मोक्याच्या ठिकाणी असलेले आलिशान वेदांत हॉटेल मुलगा सिद्धांत याच्यासाठी 67 कोटी रुपयांना खरेदी करणारे मिंधे गटाचे नेते व राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना या लिलाव प्रक्रियेतून माघार घ्यावी लागली. विरोधकांनी या मुद्द्यावरून शिरसाट यांच्यावर टीकेचा भडीमार केला होता. इतका पैसा आला कुठून, असा सवाल उपस्थित केला होता. त्यामुळे शिरसाट यांची टरकली आणि त्यांनी या प्रक्रियेतून माघार घेत असल्याचे स्वतःच जाहीर केले.

संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत याच्या ‘मेसर्स सिद्धांत मटेरियल प्रोक्युअरमेंट अ‍ॅण्ड सप्लाय कंपनी’ने शासकीय लिलाव प्रक्रियेत वेदांत हॉटेल विकत घेतले होते. वेदांत हॉटेल सिद्धांतलाच मिळावे यासाठी महसूल अधिकाऱ्यांनी अटी-शर्तीही बदलल्या. मात्र हे प्रकरण अंगाशी येतेय असे समजताच शिरसाट यांनी माघार घेतली.

माघारीमुळे शिरसाटांना 20 लाखांचा दंड

संजय शिरसाट यांनी खरेदी प्रक्रियेतून माघारी घेतली असली तरी त्यांना 20 लाखांचा दंड भरावा लागणार आहे. कारण या लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी काही अटी होत्या. अनामत रक्कम भरावी लागली होती. तसेच हॉटेल खरेदीनंतर 25 टक्के रक्कम लिलावाच्या एक महिन्यात, तर 75 टक्के रक्कम लिलावानंतर तीन महिन्यांत देणे बंधनकारक होते. तीन महिन्यांत रक्कम भरली नाही तर अनामत रक्कम जप्त करण्यात येईल अशी अट होती.