तुकोबांचा पालखी सोहळा सराटी मुक्कामी दाखल

sant-tukaram-palkhi-reaches-sarati-halt

>> नीलकंठ मोहिते, रेडा

जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पुणे जिह्याच्या हद्दीच्या शेवटच्या गावी नीरा नदीकाठी वसलेल्या इंदापूर तालुक्यातील सराटी येथे पुणे जिह्यातील शेवटच्या मुक्कामासाठी हरिनामाच्या गजरात सोमवारी (दि. 30) रात्री उशिरा दाखल झाला. आज नीरा स्नानाने सोहळा सोलापुरात दाखल होणार आहे.

सोमवारी सकाळी पालखीतील पादुकांचे पूजन करून सोहळा सराटी गावाकडे मार्गस्थ झाला. वडापुरी येथील विश्रांती आटोपून, बावडा येथे पालखी सोहळ्याचे दुपारच्या मुक्कामासाठी ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केले. बावडा गावच्या वेशीवर पालखी सोहळा दुपारी पोहोचला. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ यांनी पालखीचे उत्साही वातावरणात स्वागत केले. बावडा गावाच्या वेशीतून ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेऊन बाजारतळावरती उभारण्यात आलेल्या भव्य शामियान्यामध्ये आणली. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी वारकऱयांना अन्नदान करण्यात आले. याठिकाणी पालखी सोहळा प्रमुखांचा व विश्वस्तांचा नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक उदयसिंह पाटील, विकास पाटील, माजी सरपंच किरण पाटील आदींनी सत्कार केला. येथील दुपारचा विसावा संपवून सायंकाळी पालखी सोहळ्याने सराटीकडे प्रस्थान ठेवले. यावेळी ग्रामस्थांनी वाजतगाजत गावच्या वेशीपर्यंत जात पालखीस निरोप दिला. त्यानंतर पालखी सोहळा सायंकाळी 7 वाजता नीरा नदीकाठी वसलेल्या इंदापूर तालुक्यातील सराटी येथे पुणे जिह्यातील शेवटच्या मुक्कामासाठी दाखल झाला.

विठ्ठलवाडी, वडापुरी, सुरवड, वकीलवस्ती, बावडा या गावांहून सायंकाळी इंदापूर ते सराटी असा 23 ते 24 किलोमीटर अंतर हरिनामाच्या अखंड गजरात पायी वाटचाल करून सराटी गावात मुक्कामासाठी दाखल झाला. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीत पालखी सोहळा विसावला. दरम्यान, ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने ठिकठिकाणी रांगोळ्यांच्या पायघडय़ा घातल्या होत्या. तसेच, फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. पालखी सोहळाप्रमुख व विश्वस्तांचा सन्मान करण्यात आला.

सराटी गावात पालखी सोहळा आल्यानंतर गावाच्या वेशीवर ग्रामस्थांनी रथातून पालखी खांद्यावर घेऊन मुक्काम स्थळापर्यंत टाळ-मृदंगाच्या गजरात नेली. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, हनुमंत कोकाटे, उपसरपंच संतोष कोकाटे, सरपंच प्रतिनिधी समीर तांबोळी, काकासाहेब जगदाळे, रोहित जगदाळे, सुधीर कोकाटे आदी मान्यवर आणि इंदापूर तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी, सराटी गावातील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये महाआरती संपन्न झाली.