
बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यासुद्धा त्यात आघाडीवर असून आज त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना धनंजय मुंडे आणि कुटुंबीयांच्या बेकायदा आर्थिक व्यवहारांबाबतचे पुरावे सादर केले. आता धनंजय मुंडेंचा तातडीने राजीनामा घ्या, अशी मागणीही दमानिया यांनी केली.
अंजली दमानिया यांनी देवगिरी निवासस्थानी अजित पवार यांची आज सायंकाळी भेट घेतली. सुमारे अर्धा तास ही भेट सुरू होती. त्यानंतर दमानिया यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. धनंजय मुंडे, त्यांची पत्नी राजश्री मुंडे आणि वाल्मीक कराड यांच्या गैरव्यवहारांबाबतचे पुरावे अजित पवार यांना सादर केल्याचे त्यांनी सांगितले. तिघांच्याही सह्यांनिशी असलेल्या बॅलन्स शीट्स आपण अजित पवार यांना दिल्या आहेत. थर्मल एनर्जी प्रकल्पातील राख या तिघांनी महाजेनकोला विकून सरकारची फसवणूक केली असे त्या म्हणाल्या.
सौरभ नावाच्या 28 वर्षांच्या मुलाला तलावात बुडवून मारले गेले. त्याची बॉडी 15 ऑगस्टला मिळाली. अनमोल केदार नावाच्या निरीक्षकांनी सौरभच्या वडिलांची तक्रार घेतली नाही. कारण त्याला वाल्मिक कराडचा पह्न आला होता. त्यांचा जबाब घेतला पण कारवाई काहीच झालेली नाही, असे दमानिया यांनी सांगितले.