न्यू इंडिया बँकेच्या खातेदार, ठेवीदारांना सारस्वतचा आधार; सर्व जबाबदारी घेणार; गौतम ठाकूर यांचे आश्वासन

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील आर्थिक घोटाळय़ामुळे अडचणीत सापडलेल्या बँकेचे जवळपास दीड लाख खातेदार आणि 1 लाख 3 हजार ठेवीदारांना सारस्वत बँकेने आधार दिला आहे. कुठल्याही परिस्थितीत नुकसान होऊ देणार नाही. त्यांची खाती आणि ठेवी पूर्णपणे सुरक्षित असून त्यांची संपूर्ण जबाबदारी सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेची राहील, असे आश्वासन सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांनी दिले. वर्षभरात न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेचे सारस्वत बँकेत विलीनीकरण होईल, अशी घोषणाही त्यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

देशातील सर्वात मोठी नागरी सहकारी बँक सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. दोन्ही बँकांच्या भागधारकांच्या विविध ठिकाणी बैठका घेण्यात येतील. त्यांच्या मान्यतेनंतरच भारतीय रिझर्व्ह बँकेकडे याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात येईल. या संपूर्ण प्रक्रियेसाठी वर्षभराचा काळ जाईल, असेही गौतम ठाकूर यांनी स्पष्ट केले. तसेच आमची बँक ही को-ऑपरेटिव्ह असून व्यावसायिक स्पर्धेत उतरण्याचा बँकेचा कोणताही मानस नसल्याचेही ते म्हणाले.

या वेळी सारस्वत बँकेचे संचालक किरण उमरूटकर, के.व्ही. रांगणेकर, सल्लागार रवींद्र चव्हाण, प्रशासक श्रीकांत, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ए.ए. पाटील आदी उपस्थित होते.

आरबीआयने उघडीस आणला 122 कोटींचा घोटाळा
रिझर्व्ह बँकेने यंदाच्या फेब्रुवारीत न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेचा घोटाळा उघडकीस आणला होता. गेली काही वर्षे सुरू असलेल्या या घोटाळय़ात 122 कोटींचा अपहार झाल्याचे उघकीस आले असून बँकेचे तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्षांसह अनेक उच्चपदस्थांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

चौकशीसाठी सहकार्य करणार
न्यू इंडिया बँक आर्थिक घोटाळाप्रकरणी तपास करत असलेल्या ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखेला चौकशीसाठी सहकार्य करणार, असे गौतम ठाकूर म्हणाले. न्यू इंडिया बँकेतील कर्मचाऱयांच्या मुलाखती घेऊन त्यांना सामावून घ्यायचे की नाही याचा निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.

न्यू इंडियाची सद्यस्थिती
न्यू इंडिया बँकेने 31 मार्च 2025 पर्यंत 2,397.85 कोटी रुपयांच्या ठेवी आणि 1,162.67 कोटी रुपयांच्या कर्जांची नोंद केली. बँकेचा एकूण व्यवसाय 3,560.52 कोटी रुपयांचा आहे. तर आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये बँकेचे भांडवल उणे 102.74 कोटी इतके नोंदवले गेले.

सारस्वत बँकेने आतापर्यंत मराठा मंदिर सहकारी बँक, मांडवी सहकारी बँक, अण्णासाहेब कराळे जनता सहकारी बँक लिमिटेड, मुरघा राजेंद्र सहकारी बँक लि, नाशिक पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लि. साऊथ इंडियन को-ऑपरेटिव्ह बँक लि आणि कोल्हापूर मराठा सहकारी बँक लिमिटेडचे विलीनीकरण करून घेतले आहे.