
छत्रपती शिवरायांचा बालपणीचा सवंगडी सूर्यराव काकडे, ज्यांना इतिहासात सूरराव, सूर्याजी या नावानेसुद्धा ओळखले जाते. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पांगारे नावाच्या गावात जन्मलेल्या सूर्यरावांनी रायरेश्वर मंदिरात शिवरायांनी स्वराज्य स्थापनेच्या घेतलेल्या शपथेपासून ते साल्हेरच्या महासंग्रामापर्यंत शिवरायांना साथ दिली. स्वराज्याची पहिली मोहीम असलेला रोहिडा व जावळी सर करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या परामात महत्त्वाचा उल्लेख येतो तो साल्हेरच्या युद्धाचा. 1672 मध्ये मुघल साम्राज्याविरुद्धच्या साल्हेरच्या युद्धात त्यांनी अतुलनीय शौर्य दाखवले. साल्हेरच्या रणांगणावर त्यांना वीरमरण प्राप्त झाले. त्यांच्या निधनानंतर शिवाजी महाराजांनी त्यांना ’महाभारतातील कर्णा’शी उपमा देत दुःख व्यक्त केले होते. त्यांची समाधी नाशिक जिह्यातील साल्हेर किल्ल्यावर असून समाधीवर ‘चंद्रसूर्य असेपर्यंत तुमची कीर्ती राहील’ असा उल्लेख आहे.


























































