
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या डॉ. प्रिया शिंदे या विराजमान झाल्या असून, त्यांच्या कुणबी जातप्रमाणपत्राला आता आव्हान देण्यात आले. खोटी कागदपत्रे व पुरावे देऊन हे प्रमाणपत्र मिळवण्यात आले, असे दोन राजकीय कार्यकर्त्यांनी जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी राखीव होते. जिल्हा परिषदेची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात झाली, तर अध्यक्षपदाची निवडणूक 20 मार्चला पार पडली. यावेळी अध्यक्षपदी भाजपच्या डॉ. प्रिया शिंदे यांची निवड झाली. या निवडीविरोधात आता माण तालुक्यातील मलवडी येथील जयदीप मगर आणि खटाव तालुक्याच्या विसापूर येथील संतोष साळुंखे यांनी जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात तक्रार अर्ज दिला आहे.
अध्यक्षपद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिलेसाठी राखीवहोते, तर खटाव जिल्हा परिषदेच्या खुल्या गटातून प्रिया शिंदे या निवडून आलेल्या आहेत. निवडणूक लढविताना त्यांनी त्यांच्या नामनिर्देशनपत्रात जातीचा उल्लेख हा केवळ ‘मराठा’ असा केलेला आहे. पण, अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी ओबीसी जातीचे प्रमाणपत्र हे खोटी कुटुंबाची कंशावळ, खोटी कागदपत्रे, चुकीचे पुराव देऊन, मूळ रहिवासी ठिकाण लपवून तसेच तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्याशी संगनमत करून काढलेले आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी ऍड. दत्तात्रय घोडके यांनी कवकीलपत्रही दाखल केले. याबाबत मुदतीत निकाल न झाल्यास आम्ही उच्च न्यायालयात जाऊ, असेही ऍड. घोडके यांनी सांगितले.
प्रिया शिंदे यांनी कुणबी जातीचे प्रमाणपत्र काढलेले आहे. त्याविरोधात जयदीप मगर आणि संतोष साळुंखे यांनी जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी कुणबी जातीचे बेकायदेशीरपणे प्रमाणपत्र काढल्याची तक्रार आहे. कायद्याची प्रक्रिया न राबवता घाईगडबडीत जातीचे प्रमाणपत्र दिलेले आहे. सुनावणीनंतर प्रमाणपत्र वैध करायचे का नाही, त्याचा निर्णय जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती घेईल, असे तक्रारदारांचे वकील ऍड. दत्तात्रय घोडके यांनी सांगितले.




























































