
सौदी अरबमध्ये गेल्या 70 वर्षांपासून अस्तित्वात असलेली कफाला प्रणाली अखेर रद्द करण्यात आली आहे. जूनमध्ये या बदलाची घोषणा करण्यात आल्यानंतर अखेर आज अधिकृतपणे ही रद्द करण्यात आली आहे. कफाला प्रणाली रद्द करण्यात आल्याने याचा फायदा 1.3 कोटी स्थलांतरित कामगारांना मिळणार आहे. सौदी अरबमध्ये स्थलांतरित यापैकी सर्वात जास्त लोक हे हिंदुस्थान, बांगलादेश, नेपाळ आणि फिलिपिन्समधून आले आहेत. सौदी अरबमध्ये कफाला प्रणाली रद्द करण्यात आली असली तरी यूएई, कुवेत, ओमन, बहरिन, लेबनॉन आणि जॉर्डन यासारख्या देशात ती अजूनही अस्तित्वात आहे.
कफाला हा शब्द कफिल या शब्दापासून पुढे आला आहे. याचा अर्थ परदेशी कामगारांच्या निवास आणि कामासाठी जबाबदार प्रायोजक किंवा व्यक्ती असा होतो. 1950 च्या दशकात आखाती देशांत तेल उद्योग तेजीत होता. तेलाची मागणी वाढली. त्याकाळी देशात स्थानिक लोकसंख्या कमी होती. त्यामुळे त्यांना मोठय़ा संख्येने परदेशी कामगारांची आवश्यकता होती. आखाती देशात काम करण्यासाठी आलेल्या परदेशी कामगारांच्या हालचाली आणि कामावर नियंत्रण ठेवणे देखील आवश्यक होते. त्यामुळे कफाली प्रणाली निर्माण झाली. जेव्हा एखादा कामगार या देशात येतो. त्यावेळी कफाला प्रणालीअंतर्गत प्रवेश करतो. त्यानंतर त्याला येथील नियम आणि कायदे लागू होतात. कामगार कोणते काम करणार, किती तास काम करणार, त्याचा पगार किती असेल, हे सर्व कफालाअंतर्गत ठरवले जाते. कफाला पद्धतीमुळे मानवधिकार संघटना आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटनांनी याला विरोध दर्शवला होता. या कफालाला आधुनिक गुलामगिरी म्हटले होते. कफाला पद्धत रद्द केल्यानंतर, सौदीने नवीन नियम लागू केले ज्याअंतर्गत कामगारांना पूर्वीपेक्षा जास्त स्वातंत्र्य मिळेल. नवीन प्रणालीनुसार, कामगारांना आता त्यांच्या प्रायोजकाच्या संमतीशिवाय नोकरी बदलण्याची परवानगी असेल.



























































