Saudi Arabia Sleeping Prince – सौदीचा ‘स्लीपिंग प्रिन्स’ अल वलीद बिन खालिदचं निधन, 20 वर्षांपासून होता कोमात

सौदी अरबचा प्रिन्स अल वलीद बिन खालिद बिन तलाल अल सऊद याचे शनिवारी निधन झाले. गेल्या 20 वर्षांपासून तो कोमामध्ये होता. त्यामुळे त्याला ‘स्लीपिंग प्रिन्स’ अर्थात झोपलेला राजकुमार असेही म्हटले जात होते.

प्रिन्स अल वलीद सौदी अरबच्या राजघराण्याचे ज्येष्ठ सदस्य प्रिन्स खालिद बिन तलाल यांचा मुलगा आणि अब्जाधीश प्रिन्स अल वलीद बिन तलाल यांचा भाचा होता. 1990 मध्ये त्याचा जन्म झाला होता.

2005 रोजी लंडनमध्ये मिलिट्री ट्रेनिंग दरम्यान त्याचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली होती. तेव्हापासून तो कोमामध्ये होता. सौदी सरकारने प्रिन्सच्या उपचारांसाठी अमेरिका आणि स्पेनच्या तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक बोलावले होते. मात्र तो कधीच पूर्ण शुद्धीत येऊ शकला नाही. त्याच्या शरीराची कधीमधी हालचाल व्हायची. त्यामुळे तो पुन्हा उठून उभा राहील अशी आशा त्याच्या कुटुंबियांना होती.

प्रिन्स अल वलीद याला डॉक्टरांनी वैद्यकीय दृष्ट्‍या बेशुद्ध घोषित केले होते. परंतु त्याच्या वडिलांनी त्याचे उपचार बंद केले नाहीत. ‘जीवन अल्लाह देतो आणि ते हिरावून घेण्याचा अधिकारही त्यालाच आहे’, असे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे त्यांनी रियादच्या महालात मुलासाठी एक विशेष खोली बनवली होती. तिथे 24 तास डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय पथक उपस्थित असायचे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सोशल मीडियावर प्रिन्स अल वलीद याचे अनेक व्हिडीओही समोर यायचे. यात तो डोळ्यांची उघडझाप करताना, शरीराची हालचाल करताना दिसत होता. त्यामुळे लोकांनाही आपला राजकुमार एक दिवस पुन्हा पहिल्यासारख्या होईल अशी आशा होता. त्यामुळे सोशल मीडियावरही स्लीपिंग प्रिन्स असा हॅशटॅग ट्रेंड व्हायचा. मात्र प्रिन्स कोमातून कधी बाहेरच आला नाही आणि आता वयाच्या 35 व्या वर्षी त्याची प्राणज्योत मालवली.