सावनी बंधूंना अमेरिकेत 835 वर्षांची शिक्षा; व्हिसा फसवणूक, मनी लॉण्डरिंग, करचोरी, आरोग्य सेवा घोटाळ्यात आरोप सिद्ध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया येथे वास्तव्यास असलेल्या हिंदुस्थानी वंशाच्या दोन भावांनी केलेल्या आर्थिक घोटाळ्याने खळबळ उडाली आहे. भास्कर सावनी (60) आणि अरुण सावनी (58)  अशी त्यांची नावे आहेत. सावनी बंधूंनी वर्षानुवर्षे विविध मार्गांनी फसवणूक करून करोडो रुपयांची कमाई केल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील शिक्षा अत्यंत कठोर असू शकते. न्यायालयाकडून भास्कर सावनी यांना 420 वर्षे, तर अरुण सावनी यांना 415 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे. दोघांची शिक्षा एकत्र केल्यास तब्बल 835 वर्षांच्या कारावासाचा सामना त्यांना करावा लागू शकतो.

न्यायालयाने भास्कर सावनी आणि अरुण सावनी या दोघांना अनेक राज्यांमध्ये पसरलेल्या गुन्हेगारी कटात दोषी ठरवले आहे. व्हिसा फसवणूक, आरोग्य सेवा फसवणूक, मनी लॉण्डरिंग आणि करचोरी अशा विविध गंभीर गुह्यांमध्ये त्यांच्यावर दोष सिद्ध झाला आहे. मेडिकेड आरोग्य विमा कार्यक्रम आणि एच-1 बी व्हिसा प्रणाली या अमेरिकेतील दोन महत्त्वाच्या सरकारी योजनांमधून या बंधूंनी मोठय़ा प्रमाणावर गैरव्यवहार केल्याचे तपासात समोर आले आहे.