
‘‘मुंबईच्या 10 बाय 10 च्या खोलीत राहून मुंबईला आर्थिक राजधानी बनवणारा कोकणी माणूस आता लाचारी सोसायला तयार नाही. सत्ताधाऱयांकडून वर्षानुवर्षे दिल्या जाणाऱ्या भूलथापा अन् रेल्वेच्या जनरल डब्यात जनावरांसारख्या प्रवासामुळे चाकरमान्यांचा संयम आता सुटला आहे. सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न मार्गी लावणाऱ्यालाच मुंबईवर राज्य करण्याचा अधिकार असेल’’, अशा शब्दांत कोकण रेल्वे प्रवाशांनी आणि मुंबईतील चाकरमान्यांनी राजकीय पक्षांना ठणकावले आहे.
सावंतवाडी टर्मिनस हे केवळ रेल्वे स्टेशन नसून मुंबईत राबणाऱया चाकरमान्याला आपल्या गावी, आई-वडिलांकडे नेणारा हक्काचा ‘सेतू’ आहे. मात्र, गेली अनेक वर्षे या टर्मिनसचे काम कासवगतीने सुरू असल्याचा आरोप होत आहे. केरळ आणि गोव्याला जाणाऱया गाडय़ा कोकण रेल्वेवरून सुसाट जातात, पण कोकणी माणसाच्या नशिबी मात्र आजही सणासुदीला 4-4 हजार रुपये मोजून ट्रॅव्हल्सचा प्रवास किंवा रेल्वेच्या वेटिंग लिस्टची लाचारी उरली आहे.
रेल्वे अधिकाऱयांकडून ‘सावंतवाडी टर्मिनसच्या मागणीचा पुरावा काय?’ असा तांत्रिक प्रश्न विचारला जात असल्याने जनतेत संतापाची लाट आहे. ‘आमच्या जमिनी घेतल्या, झाडे तोडली, बोगदे खणले हा पुरावा कमी आहे का?’ असा संतांप सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला जात आहे. आता हा पुरावा फाईलमध्ये नाही, तर मतपेटीतून देण्याचा निर्धार चाकरमान्यांनी केला आहे.
सोशल मीडियावर मोहिमेचा वणवा
फेसबुक, व्हॉट्सऍप आणि ट्विटरवर #SawantwadiTerminusNeedsAttention आणि #VoiceOfKonkan हे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबईत स्थायिक असलेल्या लाखो चाकरमान्यांनी ही मोहीम हाती घेतली आहे. राजकीय नेत्यांनी जर या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले नाही, तर आगामी निवडणुकीत ‘मतदान’ हेच बदला घेण्याचे शस्त्र असेल, असे या मोहिमेतून स्पष्ट होत आहे.
निवडणुकीत कळीचा मुद्दा
आगामी मुंबई महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हा मुद्दा कळीचा ठरणार आहे. मुंबईच्या सत्तेच्या चाव्या या कोकणी माणसाच्या हातात आहेत. त्यामुळे पिट-लाइनसह पूर्ण क्षमतेचे टर्मिनस ही प्रमुख मागणी करण्यात आली आहे. ‘जे हात टर्मिनस पूर्ण करतील, तेच मुंबईवर राज्य करतील’ असा इशारा नेत्यांना देण्यात आला आहे. केवळ आश्वासनं किंवा ‘भूमिपूजन’ नको, तर प्रत्यक्ष गाडय़ा कधी सुटणार? असा जाब विचारला जात आहे.
सावंतवाडी टर्मिनसचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून तिथे ‘पिट-लाइन’ कार्यान्वित करणे.
सावंतवाडीतून सुटणाऱया स्वतंत्र गाडय़ांची संख्या वाढवणे.
सणासुदीच्या काळात होणारी प्रवाशांची लूट आणि हाल थांबवणे.
शिवसेना तेव्हा ही अन् आजही आग्रही
तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे भूमिपूजन झाले होते. त्या वेळी मी स्वतः खासदार होतो, परंतु अद्यापही दुसऱया फेजचे काम कोकण रेल्वे प्रशासनाने सुरू केलेले नाही. हा पैसा नेमका कुठे नेला हा खरा प्रश्न आहे. सावंतवाडी रेल्वे टर्मिनससाठी शिवसेनेने सुरुवातीपासून आंदोलन छेडले होते. हे टर्मिनस व्हावे यासाठी आजही शिवसेना आग्रही आहे. – विनायक राऊत, शिवसेना
कोकण रेल्वेचे सीएमडी झा विचारतात ‘टर्मिनस कहा पे है?’
या सावंतवाडी रेल्वे टर्मिनससाठी लागणाऱया पाण्याची व्यवस्था सावंतवाडी नगर परिषदेकडून केली जाणार होती. हे पाणी तिलारी जलसिंचन कालव्यामधून आणण्याचा प्रकल्प त्या वेळी मंजूर करण्यात आला होता, तर मग माशी कुठे शिंकली? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या रेल्वे टर्मिनसच्या कामाचे भूमिपूजन केले होते असे असतानाही कोकण रेल्वेचे सीएमडी झा विचारतात ‘टर्मिनस कहा पे है?’ सावंतवाडी रेल्वे स्टेशन हे साईट स्टेशन असल्याचे सांगतात. ही अत्यंत संतापजनक गोष्ट असून ज्याने कोकण रेल्वेसाठी जमिनी दिल्या त्या भूमिपुत्रांचा हा अवमान आहे असे विनायक राऊत म्हणाले.



























































