म्हाडाच्या मास्टर लिस्टच्या गाळे वाटपात घोटाळा; बनावट कागदपत्रे बनवून घर लाटणाऱ्या 15 जणांवर खेरवाडी पोलिसांची कारवाई

भूसंपादन यादीतील बनावट नावे आणि बनावट रहिवाशी याद्यांच्या आधारे म्हाडाच्या मास्टर लिस्टमधील घरांचा ताबा घेणाऱ्या 15 जणांविरुद्ध खेरवाडी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिळकत व्यवस्थापक अवधूत बेळणेकर यांनी खेरवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळात मास्टर लिस्टच्या गाळ्यांच्या वाटपात मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. भूसंपादन यादीतील बनावट नावे आणि बनावट रहिवासी याद्यांमध्ये फेरफार करून घरे लाटली. या प्रकरणात सुरेश चिकणे यांच्यासह इतरांनी बनावट दस्तऐवज सादर करून घरांचा लाभ घेतला. मूळ भूसंपादन यादीत नसलेल्या 15 नावांचा समावेश करण्यात आला होता, त्यापैकी 13 जणांनी प्रत्यक्ष गाळे मिळविले आहेत. याशिवाय दोन हस्तलिखित बनावट यादी तयार करून आणखी 8 जणांनी लाभ घेतल्याचे निष्पन्न झाले. ही कारवाई म्हाडाच्या मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालानंतर करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक सुरेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.