
उत्तर प्रदेशातील पिलभित जिह्यात वाघिणीची दहशत पसरली आहे. गेल्या काही दिवसांत वाघिणीने तीन जणांना ठार केलेय. त्यामुळे गावोगावी भीतीचे वातावरण आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिह्यातील 15 गावांमधील 18 सरकारी शाळा बंद करण्यात आल्या आहेत.
17 जुलै रोजी बिथरा मंदारिया येथे वाघिणीने एका महिलेला ठार केले. त्याआधीही अशाच दोन घटना घडल्या होत्या. तेव्हापासून तीन दिवस वाघिणीला जेरबंद करायचे प्रयत्न सुरू आहेत. तब्बल 10 पथके या मोहिमेवर आहेत. पिंजरे आणि गस्त पथकांचा वापर करून वाघिणीला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण त्याला यश आलेले नाही. वाघीण ऊस आणि भातशेतातून पळून जात असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. वाघिणीच्या वाढत्या हल्ल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सुरुवातीला प्रशासनाकडून काहीच कारवाई होत नसल्याबद्दल तीव्र नाराजी होती.
वाघिणीला शोधण्यासाठी 100 वन कर्मचारी, 100 पोलीस अशी 200 लोकांची टीम 15 चौरस किलोमीटर क्षेत्रात दिवस-रात्र गस्त घालत आहे. एवढेच नव्हे तर चार हत्ती आणि सोबत चार हायटेक ड्रोनची मदत घेण्यात येत आहे.
वाघिणीने वारंवार हल्ले केल्यामुळे वन अधिकाऱ्यांनी तिला गोळी मारण्याची परवानगी मागितली आहे. यासाठी राज्याच्या मुख्य वन्यजीव वॉर्डनशी चर्चा सुरू आहे. जिल्हाधिकारी ज्ञानेंद्र सिंह यांनी सांगितले की, या प्रकरणात पिलीभीत व्याघ्र प्रकल्पांचे प्रादेशिक संचालक रमेश चंद्र यांच्याशीही चर्चा झाली आहे. वाघिणीच्या पूर्वइतिहासाचा आढावा घेतल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
वाघिणीची शेवटची उपस्थिती 18 जुलै रोजी दांडिया गावात नोंदवली गेली. तिथे खाकरा नदी ओलांडताना तिचे ठसे दिसले.