
>> राहुल गोखले
समाजाला विज्ञाननिष्ठ करण्याची सुरुवात लहान मुलांमध्ये ती जाणीव निर्माण करण्यापासूनच होऊ शकते. मात्र त्यासाठी विज्ञानाची गोडी त्यांना लागणे आवश्यक व त्याकरिता ते अगदी सोप्या, पण रंजक भाषेत त्यांना समजावून देणे, त्यांची जिज्ञासा जागी करणे आवश्यक. प्रा. देवबा पाटील यांचे ‘मुलांसाठी विज्ञान कथा’ हे पुस्तक (प्रकाशक: ज्ञानगंगा प्रकाशन) हे त्या दृष्टीने दखल घ्यावे असे. विज्ञान समजून घेण्यासाठी प्रयोगशाळा वा फळा असायलाच हवा असे नाही. निसर्गातील, रोजच्या जगण्यातील अनेक घटनांमागील विज्ञान जाणून घेणे हेही मुलांना रंजक वाटू शकते. प्रस्तुत पुस्तक त्याचा प्रत्यय देईल.
अनंतराव हे भारतीय विज्ञान संस्थेमधून निवृत्त झालेले वैज्ञानिक; पण स्वछ हवेत राहायचे म्हणून ते गावात आपल्या पुतण्याकडे राहत असतात. त्या पुतण्याचा मुलगा स्वरूप आणि आजोबा अनंतराव हे रोज सकाळी शेतावर फिरायला जातात तेव्हा या दोन पात्रांदरम्यान होणाऱया संवादाच्या माध्यमातून लेखक निसर्गातील अनेक घटना-घडामोडींमागील वैज्ञानिक संकल्पना समजावून सांगतो. त्यात अगदी स्वच्छ हवेचे महत्त्व काय, हवेला रंग व आकार नसूनही ती आपल्याला का जाणवते किंवा ऋतू कसे होतात, अशा अगदी मूलभूत घटनांचे स्पष्टीकरण आजोबा आपल्या नातवाला देतात. त्यात उत्तर व दक्षिण गोलार्ध ध्रुवांना जोडणारे अक्ष इत्यादी माहिती येते. बाहेरचे तापमान वाढले किंवा कमी झाले तरी शरीराचे तापमान त्यानुसार बदलत कसे नाही? या प्रश्नाचे उत्तर आजोबा देतात. थंडी वाजली की, शरीर थरथरते आणि स्नायू आकुंचन पावतात, तर उष्णता वाढली की, घाम येतो. यातून शरीराचे तापमान कायम ठेवण्यासाठी कसा उपयोग होतो किंवा थंडीत लोकरीचे कपडे घातले की, थंडी का वाजत नाही? हिवाळ्यात बोलताना तोंडातून वाफ का बाहेर पडते? अशा अनेक प्रश्नांवर आजोबा नातवाच्या जिज्ञासेचे शमन करतात.
धुके व धुरके कसे व का निर्माण होते, धुरके आरोग्यासाठी पोषक का नसते यावरही आजोबा वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट करतात. झाडाची पाने त्यातील हरित द्रव्यामुळे हिरवी असतात. त्याचा उपयोग वनस्पती अन्न तयार करण्यासाठी करते. हिवाळ्यात पानगळ होते. झाडाची मुळे जमिनीतून जे पाणी शोषतात ते केशाकर्षणाच्या सिद्धांताने झाडाच्या शेंडय़ापर्यंत पोचते. फुलांचा गंध हा त्यांच्या पाकळ्यांमधील ग्रंथींमधील तैलकणांमुळे येतो. अशा अनेकविध गोष्टी आजोबा आपल्या नातवाला अगदी सहज संवादातून सांगतात. सूर्यफूल नेहमी सूर्याकडे तोंड केलेले का असते, दवबिंदू कसे तयार होतात, विजेच्या तारांवर बसलेल्या पक्ष्यांना विजेचा धक्का का बसत नाही अशा नातवाच्या अनेकविध शंकांना आजोबा समाधानकारक उत्तर देतात.
लेखकाने यात निवडलेल्या घटना या लहान मुलांना रोज अवती भवती दिसणाऱया-आढळणाऱया आहेत. एका अर्थाने बिनभिंतींच्या उघडय़ा शाळेतील या घडामोडी आहेत. त्यामागे वैज्ञानिक संकल्पना आहेत. ही त्यांची उत्सुकता चाळविण्याचे काम हे पुस्तक अवश्य करेल आणि अशा आणखी घटनांमागील विज्ञान समजून घेण्यास उद्युक्त करेल. आजोबा-नातू असा हा दैनंदिन संवाद असल्याने लेखकाने वापरलेली भाषा ही घरगुती, जिव्हाळ्याच्या स्वरूपाची आहे. लेखकाची शैली रंजक आहे. साहजिकच लहान मुलांना पुस्तक वाचताना ती भावेल.
रेखाचित्रे मजकुराला पूरक असल्याने ती पुस्तकाच्या वाचनीयतेत भर घालतात. पुस्तकाचे आणखी एक वैशिष्टय़ नोंदविले पाहिजे ते म्हणजे या संवादादरम्यान आजोबांच्या तोंडी आपल्या नातवाच्या जिज्ञासेचे, निरीक्षणाचे, बालसुलभ विचारशक्तीचे कौतुक करणारे उद्गार आहेत. लहान मुलांच्या जिज्ञासेला प्रोत्साहन देण्यानेच ते अधिकाधिक प्रश्न विचारतील नि त्यातूनच विज्ञाननिष्ठ होण्याकडे त्यांचा कल वाढेल हा संदेशही लेखक यातून अप्रत्यक्षपणे देतो. लहान मुलांसाठी अशा पुस्तकांचे स्वागतच करायला हवे.
मुलांसाठी विज्ञान कथा
पुस्तक : मुलांसाठी विज्ञान कथा
लेखक : प्रा. देवबा शिवाजी पाटील
प्रकाशक : ज्ञानगंगा प्रकाशन, पुणे
पृष्ठे : 56 मूल्य : 90 रुपये

























































