
माणसाला ज्याप्रमाणे वेदना जाणवतात, तशा वेदना रोबोटला जाणवल्या तर… केंब्रिज आणि लंडन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी रोबोट्ससाठी एक अनोखी त्वचा तयार केली आहे. रोबोटिक त्वचेला कापल्यावर, भाजल्यावर वेदना होईल. अद्याप ही रोबोटिक त्वचा मानवी त्वचेइतकी परिपूर्ण नाही, परंतु पहिल्यांदाच रोबोटसाठी अशी वस्तू बनवण्यात यश आले आहे.
रोबोटिक त्वचा लवचिक आहे आणि विजेवर चालते. त्वचेमध्ये 8.6 लाख सेन्सर आहेत जे त्वचेला कोणत्याही प्रकारचा स्पर्श किंवा नुकसान याची जाणीव करून देऊ शकतात. शास्त्रज्ञांनी अनेक चाचण्या केल्या आहेत आणि रोबोटिक त्वचेला प्रशिक्षित करण्यासाठी मशीन लर्निंगचा वापर करत आहेत.
प्रशिक्षणादरम्यान, शास्त्रज्ञांनी त्वचेला गरम केले, बोटांनी दाबले, हलक्या हाताने स्पर्श केला आणि सर्जिकल चाकूने ते कापले. या चाचण्यांमधून मिळालेल्या माहितीच्या मदतीने, रोबोटिक हाताला वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्शाचा अर्थ काय हे शिकवण्यात आले. हे संशोधन जर्नल सायन्स रोबोटिकमध्ये प्रकाशित झाले आहे.
‘वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्शासाठी वेगवेगळे सेन्सर असल्याने असे साहित्य तयार करणे कठीण असते,’ असे केंब्रिजच्या अभियांत्रिकी विभागातील प्रमुख लेखक डॉ. डेव्हिड हार्डमन म्हणाले. ‘आम्हाला असा उपाय विकसित करायचा होता जो एकाच वेळी अनेक प्रकारचे स्पर्श शोधू शकेल, परंतु एकाच सामग्रीमध्ये,’ असे हार्डमन म्हणाले.