इंटेल 24 हजार कर्मचाऱ्यांना काढणार, खर्च कपातीसाठी कंपनीचा निर्णय

सेमीकंडक्टर कंपनी इंटेल 2025 मध्ये तब्बल 24 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. ही कर्मचारी कपात जवळपास 25 टक्के इतकी असणार आहे. खर्चात कपात करण्यासाठी कंपनीचे सीईओ लिप बू टॅन यांनी हा निर्णय घेतला आहे. इंटेलने जर्मनी आणि पोलंडमधील महत्त्वाचे विस्तार प्रोजेक्ट सुद्धा रद्द केले आहेत. कर्मचारी कपात करण्यात आल्यानंतर कंपनीची आर्थिक स्थिती सुधारेल, असे कंपनीला वाटत आहे. 2024 च्या अखेरपर्यंत इंटेलमध्ये एकूण कर्मचारी संख्या ही 99 हजार 500 इतकी होती. परंतु, 2025 च्या अखेरीस ही संख्या थेट 75 हजारांपर्यंत खाली येईल.

सीईओ टॅन यांनी कर्मचाऱ्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले की, या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने आधीच व्यवस्थापन सिस्टम अर्धी केली आहे. इंटेलने जर्मनीतील 3 हजार कर्मचाऱ्यांसाठीचा प्रस्तावित मेगा फॅब आणि पोलंडमधील 2 हजार कर्मचाऱ्यांसाठी असेंब्ली आणि चाचणी सुविधा सुद्धा रद्द केली आहे. कर्मचारी कपातीच्या निर्णयाआधीच हे दोन्ही प्रकल्प दोन वर्षांसाठी पुढे ढकलण्यात आले होते. कोस्टा रिकामधील इंटेलच्या 3 हजार 400 कर्मचाऱयांपैकी 2 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना या कपातीचा फटका बसणार आहे.