जामखेड-सौताडा राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच; बीड रोडवर रस्त्यावरील लाईटच्या पोलला गाडी धडकली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या तीन वर्षांपासून जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. अठरा महिने काम पूर्ण करण्याचा कालावधी असताना ३६ महिने झाले तरी काम अपूर्ण आहे. काही ठिकाणी अर्धवट काम आहे, त्या ठिकाणी दिशादर्शक फलक,रेडियम नाहीत. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. अर्धवट काम यामुळे तीन वर्षात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. बीड रोडवरील मार्केट यार्ड समोर रस्त्यावर लाईटच्या पोलला गाडी धडकून गंभीर अपघात झाला आहे.

तीन वर्षे झाले तरी काम पूर्ण होत नाही, अतिक्रमणे हटवली जात नाहीत, रस्त्यावर लाईटचे पोल आहेत, रस्त्याचे काम करताना लाईटचे पोल न हटवता काम पूर्ण केल्यामुळे अपघात घडत आहेत. ही केवळ चूक नसून, थेट प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे उदाहरण आहे.

अतिक्रमण हटविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांनी उपोषण केले होते. त्यावेळी नियमानुसार काम होईल असे सांगितले होते. अनेक ठिकाणी रस्त्यावर लाईटचे पोल आहेत तर काही ठिकाणी लाईटच्या पोल भोवती अतिक्रमणे आहेत. रस्ता अपुर्ण आहे. आता हद्द निश्चिती खुण करण्याचे काम सुरू केले आहे. पोल कधी हटविणार अतिक्रमणे कधी निघणार आणि रस्ता कधी होणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.