
मालक आणि मालकीण घराबाहेर असताना त्यांच्या बेडरूममधील कपाटातील किमती ऐवज लंपास झाले. चावी पद्धतशीर लपवलेली असतानाही 15 लाखांचे रोलॅक्सचे घडय़ाळ आणि 20 लाख किमतीचे डायमंडचे ईअर रिंग्स चोरण्यात आले. याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुलाबा येथे राहणारे प्रदीप शाह (64) या व्यापाऱयाच्या घरात चोरीची घटना घडली आहे. 2 जून रोजी प्रदीप कामानिमित्त तसेच त्यांची पत्नीदेखील दिवसभर बाहेर होते. त्यानंतर दोघेही लंडनला फिरायला गेले होते. तेथून 14 जून रोजी ते मुंबईत परतले. प्रदीप यांच्या पत्नीने बेडरूम व कपाटाची चावी कोणालाही कळणार नाही अशा ठिकाणी ठेवली होती. दोघेही लंडनला गेल्यावर सात नोकर व त्यांची मॅनेजर तसेच मुलगा असे घरी होते. दरम्यान लंडनहून परतल्यावर प्रदीप यांच्या पत्नीने कपाट उघडून पाहिले असता सोन्याचे रोलॅक्सचे घडय़ाळ व डायमंडचे ईअर रिंग्स जागेवर नसल्याचे आआले. याबाबत त्यांनी मुलगा व नोकरांकडे विचारपूस केली, परंतु सर्वांनी हात वर केल्याने प्रदीप यांनी कुलाबा पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली.
…तरीही चोरी
प्रदीप यांनी कुत्रा पाळला आहे. तो कुत्रा अनोळखी व्यक्तीला घरात येऊ देत नाही. त्यामुळे घरात राहणारे नोकर किंवा सिनेजगतात नशीब आजमाविण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुलाने हे कांड केले असावे असा पोलिसांना संशय असल्याचे सूत्रांकडून समजते. शिवाय घटना घडण्याआधीच प्रदीप यांच्या घरातील सीसीटीव्ही बंद झाले होते.