सात जोडपी घटस्फोटाच्या उंबरठ्यावरून मागे फिरली, लोकअदालतीची यशस्वी शिष्टाई

स्वर्गात बांधलेल्या लग्नाच्या गाठी अनेक विघ्न आले तरी तुटत नाहीत, याचा प्रत्यय नवी मुंबईतील सात जोडप्यांना आला आहे. वादविवाद विकोपाला गेल्यानंतर या जोडप्यांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा विचार केला. न्यायालयात घटस्फोटासाठी खटलाही दाखल केला. मात्र बेलापूर न्यायालयात झालेल्या लोकअदालतीच्या यशस्वी शिष्टाईमुळे सात जोडपी घटस्फोटाच्या उंबरठ्यावरून पुन्हा माघारी फिरली असून त्यांनी आपल्या वैवाहिक जीवनाला नव्याने सुरुवात केली आहे. या जोडप्यांचा नवी मुंबई वकील संघटनेने ‘नांदा सौख्यभरे’ हे प्रमाणपत्र देऊन सन्मान केला आहे.

केंद्र सरकारने 2025 मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्र हे सर्वाधिक घटस्फोटाचे प्रमाण असलेले राज्य असल्याचे उघडकीस आले आहे. महाराष्ट्रात घटस्फोटाचा दर 16.7 टक्के आहे. त्यानंतर कर्नाटक (11.7 टक्के), उत्तर प्रदेश (8.8 टक्के) असा क्रमांक लागतो. वाढते शहरीकरण,सामाजिक बदलांचा प्रभाव आणि वैयक्तिक स्वातंत्र्य वाढल्यामुळे अनेक राज्यांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. क्षुल्लक कारणावरून संसार मोडले जात आहेत. त्यामुळे कुटुंब व्यवस्थेला मोठा धोका निर्माण झाला आहे. प्रलंबित दावे तत्काळ निकाली काढण्यासाठी लोकअदालत सुरू करण्यात आली आहे.

नवी मुंबईत पोटगीचे दोन हजार दावे प्रलंबित
नवी मुंबईच्या कौटुंबिक न्यायालयात सध्या वैवाहिक वाद तसेच पोटगीसाठीचे १ हजार 772 दावे प्रलंबित आहेत. यातील 98 दावे शनिवारी झालेल्या लोकअदालतीत ठेवण्यात आले होते. त्यापैकी सात प्रकरणांमध्ये जोडप्यांनी घटस्फोटाचा मार्ग न स्वीकारता पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. न्यायालयीन प्रक्रियेऐवजी सामोपचाराने वाद सोडवण्याचा हा प्रयत्न एक सकारात्मक आणि प्रेरणादायी उदाहरण मानले जात आहे. सात जोडपी पुन्हा एकत्र आल्याने नवी मुंबईतील कौटुंबिक न्यायालयात झालेल्या लोकअदालतीचा निकाल अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे.

वकील संघटनेचे विशेष प्रयत्न
या सात जोडप्यांचा ‘नांदा सौख्यभरे’ या प्रमाणपत्रासह नवी मुंबई कोर्ट वकील संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला. या लोकअदालतीचे यशस्वी आयोजन जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्यासह इतर न्यायाधीशांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. लोकअदालत यशस्वी करण्यासाठी वकील संघटना आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले होते. वादविवादानंतरही वैवाहिक जीवनाची नव्याने सुरुवात करणाऱ्या या जोडप्यांना अनेकांनी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.