वसईत सात दिवस पाणीबाणी सूर्या योजनेच्या कामासाठी शटडाऊन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सूर्या पाणीपुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील तांत्रिक कामे पूर्ण करण्यासाठी आठवडाभर शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे वसईमध्ये पुढील सात दिवस पाणीटंचाई निर्माण होणार असून पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेकडून नागरिकांना करण्यात आले आहे.

वसई-विरार शहराला ४०० दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत सूर्या टप्पा १ आणि ३ तसेच एमएमआरडीएच्या योजनेतून शहराला एकूण ३५० दशलक्ष लिटर इतके पाणी मिळते. ४ ते १० एप्रिलदरम्यान मुंबई महानगरप्रदेश विकास प्राधिकरणाकडून सूर्या पाणीपुरवठा योजनेची तांत्रिक कामे पूर्ण करण्यासाठी शटडाऊन घेतला जाणार आहे. या कामामुळे १५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे शहराच्या दैनंदिन पाणी वितरणात पाण्याची तूट निर्माण होणार आहे. या कामादरम्यान महापालिकेकडून ‘झोनिंग’ पद्धत लागू करून पाणी कपात केली जाणार आहे.

तांत्रिक दुरुस्तीच्या कामादरम्यान पाणीपुरवठा कमी दाबाने आणि अपुरा होणार असल्याने नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर जपून करावा. महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे. ११ एप्रिलपासून पाणीपुरवठा पूर्वपदावर येणार आहे.