
अनियंत्रित कार बसला धडकल्याने भीषण अपघाताची घटना रविवारी आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वे वर घडली. या अपघातात सात जण ठार आणि 40 जण जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यात रविवारी पहाटे हा अपघात घडला. मृतांमध्ये कारमधील तीन आणि बसमधील चार प्रवाशांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकमेकांना धडकल्यानंतर दोन्ही वाहने इटावामधील उसराहारजवळ सुमारे 20 फूट खाली दरीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. पोलीस कर्मचाऱ्यांनी मानवी साखळी करुन प्रवाशांना दरीतून बाहेर काढले. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले.
सदर बस 60 प्रवाशांना घेऊन रायबरेलीहून दिल्लीला चालली होती. तर कार लखनऊहून आग्राकडे जात होती. आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वे वर कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अनियंत्रित कार दुसऱ्या लेनवरुन विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसला धडकली. यामुळे बसही अनियंत्रित झाली. यानंतर दोन्ही वाहने 20 फूट दरीत कोसळली. पोलीस अपघाताबाबत अधिक तपास करत आहेत.