सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचे कोट्यवधी लटकले, मिंध्यांचे आश्वासन गाजर ठरले; पालिकेच्या कर्मचाऱ्यांची मुस्कटदाबी

पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम देण्याचे मिंध्यांचे आश्वासन गाजर ठरले आहे. पालिकेच्या अडीच हजार कर्मचाऱ्यांची जवळपास 10 कोटी रुपयांची देणी लटकवली आहेत. हे सर्व पैसे पाच टप्प्यात देण्यात येणार होते. त्यातील दोन टप्पे देणाऱ्या पालिकेने तिसरा टप्पा लटकवल्याने कर्मचाऱ्यांची मुस्कटदाबी झाली आहे. दहा वर्षांनंतर हक्काचे पैसे मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

ठाणे पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग जानेवारी 2016 पासून लागू करण्यात आला आहे. यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आदेशामध्ये थकबाकीची रक्कम विविध टप्प्यांमध्ये देण्याबाबत निश्चित करण्यात आले. त्यानंतर थकबाकीचा पहिला टप्पा जून 2023मध्ये देऊन पुढील उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने देण्यात येईल असे आश्वासन कर्मचाऱ्यांना देण्यात आले, परंतु बराच कालावधी गेल्यानंतरही वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळाली नसल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्यात थकबाकी मिळणार
2024-25 अर्थसंकल्पात ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची देणी देण्याबाबत तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार ही रक्कम महापालिकेच्या विविध कररूपी उत्पन्नातून देण्यात आली, तर उरलेल्या तीन टप्प्यातील रक्कमही ल वकरात लवकर मिळावी अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. यात सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनासुद्धा ही रक्कम टप्प्याटप्प्यात अदा करण्यात येणार आहे