रायगडातील धरणांनी तळ गाठला, 150 गावपाड्यांवर भीषण पाणीटंचाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकीकडे उन्हाचा तडाका वाढला असतानाच दुसरीकडे रायगड जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. 28 धरणांपैकी 6 धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी घट झाली असून ढोकशेत धरण कोरडेठाक पडले आहे. सहा धरणांमध्ये 40 टक्क्यांहून कमी पाणीसाठा शिल्लक असून येत्या पावसाळ्यापर्यंत पाणी कसे पुरवायचे, असा प्रश्न पाटबंधारे विभागाला पडला आहे.

पाणीटंचाईमुळे रायगड जिल्ह्यातील अनेक गावपाड्यांना आतापासूनच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे. धरणांतील पाणीसाठा असाच झपाट्याने कमी झाल्यास टँकर्सची संख्या वाढवावी लागणार आहे. पुरेसा पाऊस पडूनही दरवर्षी रायगड जिल्ह्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. जिल्ह्यातील सुमारे 100 हून अधिक गावे व वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. पाण्याच्या योग्य नियोजनाअभावी ही परिस्थिती निर्माण होत असल्याचे दिसुन येते.

तात्पुरत्या उपाययोजना

पाणीटंचाईवर कायमचा तोडगा काढण्याऐवजी तात्पुरत्या उपाययोजना करण्यावरच प्रशासनाचा जोर आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे त्याच त्याच गावांना पाणीटंचाईची झळ बसत असल्याचे दिसून येते. रायगड जिल्ह्यात कोलाड पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित 28 धरणे आहेत. यामधील सुधागड तालुक्यातील ढोकशेत धरणातील पाणीसाठा संपला आहे. यामुळे या धरणावर अवलंबून असणाऱ्या सुमारे 25 हून अधिक गावे, वाड्यांवर पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

रायगडातील धरणांची टक्केवारी

कोंडगाव 36, घोटवडे 18, केवळे 28, उन्हेरे 21, रानिवली 25, पुनाडे 33 टक्के असा पाणीसाठा रायगडातील धरणांमध्ये शिल्लक आहे. सध्या या धरणांमधून करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात सुमारे 20 टक्के पाणीकपात करण्यात येत आहे. या धरणांमधील पाण्यावर सुमारे 150 हून अधिक गावे व वाड्यांमधील नागरिक अवलंबून आहेत. यामुळे पुढील कालावधीत रायगड जिल्ह्याला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.